22.4 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरआरोपींनी फक्त यशाची हमी देऊन केली लूट?

आरोपींनी फक्त यशाची हमी देऊन केली लूट?

लाखो रुपये हडपले, लातूरमध्ये नीट पेपरलीक नाही?, फसवणुकीची चौकशी?

लातूर : विनोद उगीले
मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट-युजीमधील अनियमिततेबाबत सीबीआयने देशभरात आतापर्यंत नोंदवलेल्या ७ गुन्ह्यांची तपशीलवार माहिती आणि त्यांच्या तपासातील प्रगतीची माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली. सीबीआय तपासात नीट-युजी पेपर लीक केवळ बिहार आणि झारखंडपुरता मर्यादित असल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्रातील लातूर, गुजरातमधील गोध्रा आणि राजस्थान या ३ ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अनियमिततेचे पुरावे सापडले आहेत. विशेष म्हणजे देशभरातील दाखल नेट पेपर लीक प्रकरणात लातूरचे प्रकरण मनोरंजक असल्याचे समोर आले आहे. कारण येथे विद्यार्थ्यांना यशाची हमी होती, पण त्यांना परीक्षेच्या प्रश्नांची उत्तरे स्वत:च देण्यास सांगण्यात आले होते, असे समोर आले आहे.

नीट पेपर लीक प्रकरणाने मागच्या २० ते २५ दिवसापासून संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. या प्रकरणात लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नांदेडच्या पथकाने गुन्हा दाखल केल्याने व या प्रकरणात पालिसांनी दोघांना आणि सीबीआयने एकास अटक केल्याने लातूरचे नाव चर्चेत आले. या प्रकरणी लातूरसह बिहार आणि गुजरातमधील गोध्रा, झारखंड व राजस्थान राज्यांत एकूण ७ गुन्हे दाखल असून आतापर्यंत १४ जणांना अटक झाली आहे. या ७ गुन्ह्यांपैकी सीबीआयच्या तपासादरम्यान बिहार-झारखंडमध्ये पेपर फुटला होता आणि विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक दिवस आधी उत्तरे लक्षात ठेवण्याची सक्ती करण्यात आली होती तर गोध्रामध्ये परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अचूक उत्तरे लिहिण्यास आणि उर्वरित रिक्त सोडण्यास सांगितले होते. या टोळीतील सदस्य आणि त्याचा गैरफायदा घेणा-या विद्यार्थ्यांची ओळख पटली असून कारवाई करण्यात येत आहे. गुजरातबाहेरील अनेक विद्यार्थी परीक्षेला बसल्याचे पुरावेही गोध्रा केंद्रात सापडले. राजस्थानात तीन ठिकाणी ख-या विद्यार्थ्याऐवजी दुसरेच कोणीतरी परीक्षेला बसल्याची प्रकरणे समोर आली. त्यांच्याविरुद्ध तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लातुरात कारवाई केलेले आरोपी एन. गंगाधरप्पा नानजुडप्पा, संजय तुकाराम जाधव, जलीलखॉ पठाण व फरार असलेला इरन्ना कोनगुलवार या आरोपींनी विद्यार्थ्यांना यशाची हमी देत त्यांची फसवणूक करत लाखो रुपये हडपल्याचे समोर आले आहे. सीबीआय आता त्यांनी किती जणांची फसवणूक केली. किती रक्कम हडपली, संशयित आरोपींचे इतर कोणी साथीदार आहेत का, याचा शोध घेत आहे.

तीन वर्षांपासून गोरखधंदा
नीट पेपर लीक प्रकरणात लातूरमध्ये चौकशी करण्यात येत असलेल्या आरोपींनी जवळपास मागच्या तीन वर्षापासून हा गोरखधंदा चालवल्याचे समोर येत असून सीबीआय मागच्या तीन वर्षात त्यांनी पेपर लीक केला का, अशीच विद्याथी-पालकांची फसवणूक केली का, याचा शोध घेत आहे.

आरोपींच्या मालमत्तेवर टाच?
लातुरात दाखल गुन्ह्यातील आरोपींनी मोठ्या प्रमाणात यशाची हमी देत लाखो रुपयांची विद्यार्थी व पालकांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. यातून त्यांनी कोट्यवधी रुपयाची मालमत्ता जमवली आहे. त्यांच्या मालमत्तेचीही सीबीआय माहिती घेत असल्याचे समजते. त्यामुळे भविष्यात त्यांच्या बेहिशोबी मालमत्तेवर सीबीआय टाच आणण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR