18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रआ. गायकवाडांविरुद्ध गुन्हा

आ. गायकवाडांविरुद्ध गुन्हा

राहुल गांधींविरुद्ध प्रक्षोभक विधान, कॉंग्रेस नेते, कार्यकर्ते आक्रमक
बुलढाणा : प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉंग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संदर्भात बेताल वक्तव्य केले आहे. त्यामुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच कॉंग्रेस नेते, कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. त्यावरून गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. यानंतर सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. यामुळे शहरात राजकीय तणाव निर्माण झाला आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विदेशात आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून आमदार संजय गायकवाड यांनी सोमवारी प्रक्षोभक विधान करीत राहुल गांधी यांची जीभ कापणा-याला ११ लाखांचे बक्षीस देईल, असे त्यांनी जाहीर केले होते. यावरून कॉंग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले आणि आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. त्यासाठी काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले. आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, विजय अंभोरे, महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष मंगला पाटील, प्रदेश सचिव जयश्री शेळके, सुनील सपकाळ, रिजवान सौदागर, बुलढाणा शहराध्यक्ष दत्ता काकस आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.

तत्पूर्वी, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांनीही बुलढाणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सर्व काँग्रेस पदाधिकारी यांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. यात आमदार गायकवाड यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

बुलढाणा शहर पोलिसांनी अखेर सोमवारी रात्री उशिरा आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध दखलपात्र गुन्हे नोंदवले. यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेत ‘एफआयआर’ची प्रत घेऊनच काँग्रेस नेते पोलिस ठाण्याच्या बाहेर पडले. काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर यांच्या तक्रारीवरून आमदार गायकवाड यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम १९२, ३५१(२), ३५२(३), ३५२(४) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी
आमदार गायकवाड यांच्या या विधानाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर माफी मागावी. सातत्याने प्रक्षोभक विधाने करणारे आमदार गायकवाड यांनीही माफी मागावी. बुलढाण्यात लोकशाही नसून गुंडशाही आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी केला.

बेताल आमदाराला आवरा
बेताल व बेलगाम बोलण्यासाठी कुप्रसिद्ध बुलढाण्याचा आमदार संजय गायकवाड याने पुन्हा एकदा आपली लायकी आणि पातळी दाखवून देत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल प्रक्षोभक विधान केले. या गुंड प्रवृत्तीच्या आमदाराच्या वक्तव्याची सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते या गुंडांचा बंदोबस्त करतील, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR