23.1 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeक्रीडाइंग्लंडची सेमी फायनलमध्ये दिमाखात धडक

इंग्लंडची सेमी फायनलमध्ये दिमाखात धडक

सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ
किंग्सटन ओहल : वृत्तसंस्था
टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत एकाक्षणी सुपर८ फेरीसाठी पात्र होणे खडतर झालेल्या इंग्लंडने अमेरिकेचा धुव्वा उडवत दिमाखात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडने झटपट गुंडाळलेल्या या सामन्यात अमेरिकेला ११५ धावाच करता आल्या. इंग्लंडने ९.४ षटकातच हे लक्ष्य पार करत गणितीय समीकरणांविना सेमी फायनलमध्ये स्थान पटकावले. सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारा इंग्लंड पहिलाच संघ आहे. मूळ बार्बाडोसचा पण इंग्लंडकडून खेळणारा ख्रिस जॉर्डन या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने हॅट्ट्रिक घेत अमेरिकेच्या डावाला खिंडार पाडले.

मार्क वूडच्या जागी संधी मिळालेल्या ख्रिस जॉर्डनने हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला. जॉर्डन मूळचा बार्बाडोसचा. पण तो इंग्लंडसाठी खेळतो. मायदेशात कर्मभूमी असलेल्या इंग्लंडसाठी हॅट्ट्रिकचा विक्रम जॉर्डनने नावावर केला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. अमेरिकेचा संघ एकाक्षणी १११/५ अशा स्थितीत होता. तिथून त्यांचा ११५ लाच ऑलआऊट झाला. जॉर्डनने १७ चेंडूत अवघ्या १० धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स पटकावल्या. जॉर्डनने कोरे अँडरसन, अली खान, एनपी केनिंगे आणि सौरभ नेत्रावळकर यांना माघारी धाडले. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणारा जॉर्डन इंग्लंडचा पहिलाच गोलंदाज आहे. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील ही नववी हॅट्ट्रिक आहे. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने बांगलादेश आणि अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती. या वर्ल्डकप स्पर्धेतली ही तिसरी हॅट्ट्रिक आहे.

अमेरिकेने पाकिस्तानला नमवत आशा जागवली. पण त्यानंतर मोठ्या संघांनी त्यांच्याविरुद्ध सहज विजय मिळवले. अमेरिकेतर्फे नितीश कुमारने ३० तर कोरे अँडरसनने २९ धावा केल्या. हरमीत सिंगने २१ धावा केल्या. आदिल रशीदच्या फिरकीचे कोडेही अमेरिकेला सोडवता आले नाही. सॅम करन आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत जॉर्डनला चांगली साथ दिली.
या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना जोस बटलर-फिल सॉल्ट जोडीने अमेरिकेच्या आक्रमणाचा अक्षरक्ष: पालापाचोळा केला. दोन षटके सावधपणे खेळून काढल्यावर बटलरने भात्यातली सगळी अस्त्रे परजली. हरमीत सिंगने टाकलेल्या नवव्या षटकात बटलरने ५ उत्तुंग षटकार लगावले. या षटकात त्याने ३२ धावा चोपून काढल्या. इंग्लंडने ५८ चेंडूत लक्ष्य पार केले. बटलरने ३८ चेंडूत ६ चौकार ७ षटकारांसह नाबाद ८३ धावांची खेळी केली. सॉल्टने २१ चेंडूत २५ धावा करत त्याला चांगली साथ दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR