31.4 C
Latur
Thursday, February 13, 2025
Homeमहाराष्ट्रइंटरसेप्टर वाहनांच्या रडार खरेदीत घोटाळा!

इंटरसेप्टर वाहनांच्या रडार खरेदीत घोटाळा!

अव्वाच्या सव्वा किंमतीत रडारची खरेदी
मुंबई : प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) भाडेतत्त्वावर १,३१० बस घेण्याच्या कंत्राटातील घोटाळा उघडकीस आला असताना आता एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्रिपदाच्या कार्यकाळात इंटरसेप्टर वाहनांच्या रडार खरेदीतही घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या घोटाळ््यात सहभागी असलेल्यांची माहिती लवकरच उघड होण्याची शक्यता आहे.

वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे, रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करणे आणि रस्ता सुरक्षा वाढविण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन विभागाने रस्ता सुरक्षा सहपरिवहन आयुक्त भरत कळसरकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रत्येक ‘आरटीओ’साठी ६९ इंटरसेप्टर वाहने १० कोटी रुपयांना खरेदी केली. त्यावर वायफाय आणि अत्याधुनिक ‘एनपीआर कॅमेरा’ असलेले रडार बसविण्यात येणार आहेत. एकाच ठिकाणी उभ्या अत्याधुनिक रडार असलेल्या इंटरसेप्टर वाहनांमधून वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहनांचे थेट छायाचित्रे टिपून त्यांना ई-चलान पाठवता येणार आहे.
इंटरसेप्टर वाहनासाठी एक रडार सुमारे ७ ते ८ लाखांपर्यंत मिळते. या रडारची किंमत सुमारे ३४ लाखांपर्यंत दाखवण्यात आली. अशा प्रकारे ६९ रडार खरेदीसाठी सुमारे २२ कोटी रुपये खर्च केल्याचे समजते. या प्रकरणात परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. अधिका-यांनीच दर वाढवायला सांगितल्याचे पुरवठादार कंपनीने कबूल केल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्र्यांकडून
चौकशीची शक्यता
एसटीच्या भाडेतत्त्वावर १,३१० बस घेण्याच्या कंत्राटाच्या चौकशीचे आदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे कंत्राट रद्द केले होते. आता परिवहन विभागाच्या वायुवेग पथकांसाठी खरेदी केलेल्या ६९ इंटरसेप्टर वाहनांवर कॅमेरायुक्त रडार बसवण्यात गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या रडार खरेदी प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR