25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरइंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्यांसोबत सुसंवाद बैठक

इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्यांसोबत सुसंवाद बैठक

लातूर : प्रतिनिधी
नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांच्या मनातील विश्वास, प्रेम, आपुलकीचे फलित म्हणजे डॉ. शिवाजी काळगे होय. ज्यांनी २५ वर्षे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून जनसेवा केली, त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. आता डॉ. शिवाजी काळगे यांना दिल्लीतील लोकसभेच्या दारापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे, असे म्हणत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उपस्थिताना आश्वस्त केले. डॉ. शिवाजी काळगे यांच्या उमेदवारीचे सर्वच स्तरातून स्वागत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा लातूरच्या पदाधिकारी व सदस्यांसमवेत शुक्रवारी सायंकाळी शहरातील बार्शी रोड भागातील भारत डाईन हॉल येथे सुसंवाद बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज आपण एकत्र आलो आहोत. महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून डॉ. शिवाजी काळगे निवडणूक रिंगणात आहेत. डॉ. काळगे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्या उमेदवारीचे स्वागत होत आहे. हे सर्व त्यांचा स्वभाव, त्यांच्यावर असलेले जनतेचे प्रेम यामुळे शक्य झाले. गेल्या १० वर्षात राज्यात आणि देशातील परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे, हे लक्षात घेता ही परिस्थिती बदलून आपला महाराष्ट्र, देश पूर्वीसारखा व्हावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. त्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा लढा उभारावा लागेल, असे आमदार अमित देशमुख म्हणाले.

यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले की, लोकशाहीत आपण कसे राहिले पाहिजे, कसे वागले पाहिजे, प्रत्येकाला मिळणारे अधिकार हे समान आहेत. हे सर्व आपल्या राज्यघटनेमुळे, लोकशाहीमुळे शक्य आहे. पण आज देशात लोकशाही अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न आपल्या मनात येतो. पण ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला आपला लोकप्रतिनिधी म्हणून डॉ. शिवाजी काळगे यांना संसदेच्या नवीन इमारतीत पाठवावे लागेल. आजची व्यवस्था बदलण्यासाठी आपल्याला धाडस करावे लागेल अन्यथा आपली येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. रुग्ण वाचविण्यासाठी ज्या प्रकारे आपण प्रयत्न करतो, त्याच पद्धतीचे प्रयत्न या निवडणुकीत करावे लागणार आहेत. लातूरला एम्स झाले पाहिजे, वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन प्रकल्प लातूरमध्ये यायला हवेत यासाठी येणा-या ७ मे रोजी डॉ. शिवाजी काळगे यांना मत देऊन प्रचंड मताधिक्याने लोकसभेत पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. शिवाजी काळगे यांनी २०१४ आणि २०१९ असे २ वेळा प्रयत्न केले. पण त्यावेळी संधी हुकली. पण आता २०२४ मध्ये मला जी उमेदवारी मिळाली, ती माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्यामुळे आणि आज या ठिकाणी जमलेले माझे बांधव व भगिनींचे प्रेम मिळाले, हेच मी माझे भाग्य समजतो.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आपल्यासारख्याने राजकारणात जाणे योग्य वाटत नव्हते. पण माजी मंत्री आमदार अमित देशमुख आणि माझे कुटुंबीय, मित्र परिवार यांच्या पाठिंब्यामुळे मी धाडस केले आहे. आपण दिलेल्या प्रेमाच्या जोरावर आपण नक्की यशस्वी होऊ, असा विश्वास व्यक्त करीत आपण खंबीर साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक डॉ. कल्याण बरमदे यांनी केले. यावेळी त्यांनी आजचा एक ऐतिहासिक दिवस असून आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील एक सहकारी लातूर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार म्हणून लाभला आहे. त्यामुळे डॉ. शिवाजी काळगे यांच्या रुपात जनसेवेसाठी एक उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व लाभले आहे. त्यामुळे डॉ. शिवाजी काळगे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार करावा असे म्हटले. यावेळी डॉ. अशोक आरदवाड डॉ. शिवाजी काळगे हे रुग्णप्रिय तर आहेतच. शिवाय डॉक्टरप्रेमीसुद्धा आहेत. त्यामुळे येथे एवढी मोठी गर्दी जमू शकली, असे म्हटले.

डॉ. अजय जाधव यांनी डॉ. शिवाजी काळगे यांना कॉंग्रेसने महाविकास आघाडीतून उमेदवारी दिली याबद्दल पक्षश्रेष्ठी आणि माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आभार मानतो. या उमेदवारीचे सर्वत्र स्वागत होत आहे. हाच उत्साह ७ मेपर्यंत कायम ठेवून स्वत: डॉ. शिवाजी काळगे आहे असे मानून कामाला लागावे, असे आवाहन केले. डॉ. संतोष कावठाळे यांनी डॉ. शिवाजी काळगे एक आगळेवेगळे, प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे सर्वांनी डॉ. शिवाजी काळगे यांना निवडून देत काँग्रेस पक्षाला साथ द्यावी, असे म्हटले. डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी आपण सर्व जण डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केले. डॉ. स्वाती गोरे यांनी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना निवडून द्यावे, असे म्हटले. डॉ. सुनीता पाटील यांनी डॉ. शिवाजी काळगे यांना पाठिंबा देत निवडून आणण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन केले. तसेच डॉ. शांतीलाल शहा यांनी डॉ. शिवाजी काळगे हे आपले प्रतिनिधी म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

त्यामुळे आपण सर्वांनी एक कुटुंब म्हणून डॉ. काळगे आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहू, असा संकल्प करावा, असे आवाहन केले. यावेळी डॉ. बालाजी साळुंके, डॉ. आनंद पवार, डॉ.दिनेश नवगिरे, डॉ. हुक्कीरे, डॉ. पृथ्वीराज चौहान आदी डॉक्टरांनी डॉ. काळगे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. शेवटी उपस्थित सर्व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचे आभार डॉ. अशोक पोद्दार यांनी मानले. यावेळी लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धिरज विलासराव देशमुख, डॉ. शिवाजी काळगे, अ‍ॅड. समद पटेल, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. अभय कदम, डॉ.सतीश देशमुख, डॉ. संजय वारद, डॉ. संजय पौळ, डॉ.संतोष कवठाळे, डॉ. अशोक पोद्दार, डॉ. उत्तम देशपांडे, डॉ. महेश सांडूर, डॉ. पुरुषोत्तम दरक, डॉ. विनोद कोराळे, डॉ कोरे, डॉ. सतीश बिराजदार, डॉ. सारडा यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशन, निमाचे लातूर शाखा पदाधिकारी, सदस्य वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. काळगेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे
पुणे, मुंबईपेक्षा लातूरचे विद्यार्थी अधिक प्रमाणात नीट परीक्षा उत्तीर्ण होतात. त्यामुळे लातूरला गुणवत्तेच्या निकषावर एम्स व्हायला हवे आणि त्यासाठी डॉ. शिवाजी काळगे यांना निवडून द्यावे लागेल. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी आपले कामकाज सांभाळून पुढील प्रचार आणखी चांगला कसा असेल, यावर चर्चा करून नियोजन केले जाईल. त्याकरिता आपण सर्वांनी डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रचंड मताधिक्य मिळवून द्यावे, असे आवाहन केले.

आमचे विलासराव देशमुख यांच्या विचारांचे राजकारण
आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी जे विचार दिले, त्या विचाराने आम्ही सरळ राजकारणात चालत आहोत. आम्ही ट्रॅक सोडणार नाही. आमची चाल हत्तीसारखी सरळ असून जे येतील त्यांना घेऊन, जे येणार नाहीत, त्यांना सोडून हे ब्रीद घेऊन आपण कामाला लागावे, असे आवाहन आमदार धिरज देशमुख यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR