नवी दिल्ली : इंडिया आघाडीची चौथी बैठक मंगळवार १९ डिसेंबर रोजी होणार असल्याची घोषणा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर इंडिया आघाडीची ही पहिलीच बैठक असणार आहे. ट्विट करत जयराम रमेश यांनी याबाबत माहिती दिली. इंडिया आघाडीची ही चौथी बैठक दिल्ली येथे होणार आहे, असे त्यांनी म्हटले.
सध्या इंडिया आघाडीमध्ये बरेच वाद सुरु असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विरोधकांच्या या युतीत बराच तणाव आल्याच पाहायला मिळत आहे. त्याचवेळी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ही पोस्ट केली. त्यांनी या पोस्टमध्ये इंडिया आघाडीत सामील असलेल्या पक्षांच्या नेत्यांची चौथी बैठक मंगळवार, १९ डिसेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली येथे दुपारी ३ वाजल्यापासून होणार आहे, असे म्हटले. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संयुक्त निवडणूक प्रचाराबाबतही बैठकीत चर्चा होऊ शकते. या अगोदर ६ डिसेंबर रोजी बैठक होणार होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली.