नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
आपल्या लग्नाचं ठिकाणी एकदम हटके असायला हवे, असा विचार बरेच जण करतात. त्यातून डेस्टिनेशन वेडिंग हा पर्याय पुढे आला. पण, ज्या ठिकाणाबद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत, तिथे लग्न करणे कुणालाच शक्य नाही. हे ठिकाण आहे राष्ट्रपती भवन आणि तिथे एका अधिकारी महिलेचं लग्न होणार आहे.
राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा क्राऊन कॉप्लेक्समध्ये हा लग्न सोहळा १२ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी मोजकेच लोक हजर असणार आहेत. निमंत्रण दिलेल्या व्यक्तींना ओळखपत्र बघितल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. राष्ट्रपती भवनात ज्या अधिकारी महिलेचे लग्न होणार आहे, त्यांचे नाव आहे पूनम गुप्ता. पूनम गुप्ता या सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव दलात अधिकारी असून, त्या राष्ट्रपती भवनात पीएसओ म्हणून कार्यरत आहेत.
पूनम गुप्ता यांनी ४७व्या प्रजासत्ताक दिनाच्या पथ संचलनामध्ये सीआरपीएफच्या सर्व महिला तुकड्यांचे नेतृत्व केले होते. पूनम गुप्ता यांचे लग्न राष्ट्रपती भवनात होत असल्याचे रिपोर्टस समोर आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, पूनम गुप्ता यांचे लग्न असिस्टंट कमांडन्ट अवनीश कुमार यांच्यासोबत होणार आहे. अवनीश कुमार हे जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहेत.
पूनम गुप्ता यांचे गणितामध्ये पदवीचे शिक्षण झाले आहे. त्याचबरोबर इंग्रजी साहित्यातही त्यांनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. ग्वालिअर येथील जिवाजी विद्यापीठातून त्यांनी बीएडचे शिक्षणही घेतले आहे. २०१८ मध्ये यूपीएससी सीआरपीएफ परीक्षेत ८१ वी रँक मिळवत त्या यशस्वी झाल्या होत्या.