32.8 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeराष्ट्रीयईशान्य भारतात मॉन्सूनबरोबरच पुराचे संकट

ईशान्य भारतात मॉन्सूनबरोबरच पुराचे संकट

आसाम, मणिपूरमध्ये परिस्थिती गंभीर विविध घटनांत ६ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशातील बहुसंख्य जनता उष्णतेच्या लाटेमुळे त्रस्त झाली असताना ईशान्येतील राज्यांना मात्र अतिवृष्टीमुळे मे महिन्याच्या अखेरीसच पुराचा सामना करावा लागत आहे. ‘रेमल’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अतिवृष्टी झाल्यानंतर वेळेआधीच दाखल झालेल्या मॉन्सूनने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ईशान्येतील नागरिकांची चिंता वाढविली आहे. आसाम आणि मणिपूरमधील ब्रह्मपुत्रा, बराक आदी नद्यांना महापूर आल्याने लोकांची झोप उडाली आहे.

आसाममध्ये पूरस्थिती आजही गंभीरच असून राज्यातील ९ जिल्ह्यांतील दोन लाख नागरिक प्रभावित झाले आहेत. राज्यात चक्रीवादळ, पूर आणि पावसाशी संबंधित विविध घटनांत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रह्मपुत्र आणि बराकसह इतर नद्याही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. राज्यातील नागाव, करीमगंज, हैलाकंडी, प.कारबी अँगलाँन्ग, काच्छर, होजाई, गोलाघाट, कारबी अ‍ॅगलिंग आणि दिमा हसाओ या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. रस्त्यांचे नुकसान झाल्याने बराक खो-यातील काच्छर, करीमगंज आणि हैलाकंडी या जिल्ह्यांचा उर्वरित ईशान्येशी संपर्क तुटला असून अनेक वाहने अडकून पडली आहेत.

राष्ट्रीय महामार्ग सहावरील २० मीटरचा रस्ता वाहून गेला आहे. ‘रेमल’ चक्रीवादळामुळे गती मिळाल्याने नैऋत्य मॉन्सून आसामसह ईशान्येतील इतर राज्यांतही गुरुवारी दाखल झाला. येत्या दोन दिवसांत आसाममध्ये काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

आसाममधील नुकसान
– कच्छर जिल्ह्यात पुरामुळे सर्वाधिक १,१२,२४६ लोक प्रभावित
– करीमगंज मध्ये ३७ हजार तर होजाईत २२,०५८ व हैलाकंडीत १४,३०८ जणांना फटका
– ३,२३८ हेक्टरवरील पिके पाण्यात, २,३४,५३५ प्राण्यांवरही परिणाम
– ११० मदत छावण्यांत ३५, ६४० नागरिक आश्रयाला

मणिपुरात राजभवनभोवती पाणी साचले
गेल्या काही दिवसांपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे मणिपूरमध्ये राजभवनभोवतीही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. इंफाळ खो-यात तीन जणांचा मृत्यू झाला असून पुराचा लाखो नागरिकांना फटका बसला आहे. इंफाळ नदीचे बंधारे ठिकठिकाणी फुटल्याने राजभवन परिसरात पाणी साठल्याची माहिती वरिष्ठ अधिका-यांनी दिली. मात्र, गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत परिस्थिती सुधारली असून साठलेल्या पाण्याचा निचरा करण्यात येत आहे असेही त्यांनी सांगितले.

हवामानाचे यूपीत ५ बळी
प्रतिकूल हवामानाशी संबंधित विविध घटनांमुळे उत्तर प्रदेशात पाच जणांचा मृत्यू झाला. जोरदार वा-यामुळे तात्पुरते उभारलेले शेड अंगावर पडून शहाजहानपूरमध्ये तिघांना प्राण गमवावे लागले. इतर दोघांचा उष्माघाताने मृत्यू झाला.

गंगोत्री महामार्गावर दरड कोसळली
उत्तराखंडमधील उत्तरकाशी-गंगोत्री महामार्गावर डबरानीत दरड कोसळल्याने काहीजण दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. इतर पाचजण गंभीर जखमी झाले. मदत व बचाव पथकाकडून बचावकार्य राबविले जात आहे. वाहतूक ठप्प झाल्याने ५०० वाहने अडकली आहेत.

नदी – पाणीपातळी – धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक
ब्रह्मपुत्रा – ८५.२५ मी. – ०.२९ मीटर
बराक – ३०.१५ मी. – ३.९५ मी.
कोपिली – ६२.०८ मी. – १.५८ मी.
कुशियारा – १६.५ मी. – १.५६ मी.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR