शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
सततच्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले असल्याने संपूर्ण शिरूर अनंतपाळ तालुक्यात सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी, या मागणी संदर्भात निलंगा घरणी रोडवर उजेड मोडवर शेतक-यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभय साळुंके, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर व काँग्रेसचे नेते संजय बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केले.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात मागील आठवड्यात हिसामाबाद मंडळात अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत कळवूनही प्रशासन पंचनामे करीत नाही. त्यामुळे या हिसामाबाद महसुल मंडळातील पिकांचे सरसकट पंचनामे करावे या मागणीसाठी दि.११ सप्टेंबर बुधवारी रोजी निलंगा ते घरणी रोडवर उजेड येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. विरोधी पक्षाचे काम लोकांचे प्रश्न सरकार व प्रशासनासमोर मांडणे असून यासाठी विरोधी पक्षाने भूमिका बजावली आता सत्ताधा-यांनी शेतक-यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता, सरसकट तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस चे नेते अभय साळुंके यांनी शेतक-यांशी संवाद साधताना प्रशासनाला दिला.
या प्रसंगी संजय बिराजदार,आबासाहेब पाटील उजेडकर, दिलीप ढोबळे, पी.एस.कदम, रमेश शिवणगे, गुरंिलग स्वामी यांनी शेतक-यांना संबोधित केले. प्रशासनाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण खताळ, कृषी मंडळ अधिकारी बालाजी राजवाडे, मंडळ अधिकारी संदेश कुलकर्णी, तलाठी गणेश राठोड यांनी निवेदन स्विकारले. या आंदोलनस्थळी पोलिस निरक्षिक विठ्ठल दराडे यांच्या उपस्थितीत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनात उजेडसह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.