27.2 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धवसाहेबांवर माफी मागण्याची वेळ आणू नका

उद्धवसाहेबांवर माफी मागण्याची वेळ आणू नका

मुंबई : प्रतिनिधी
तुमच्यामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना माफी मागावी लागली, यापूर्वी साहेबांनी कधीही कुणाची माफी मागितली नव्हती, त्यांच्यावर पुन्हा ही वेळ आणू नका, हे तुमच्या राजकीय कारकिर्दीसाठी चांगले नाही, असे म्हणत विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गो-हे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना कानपिचक्या दिल्या.

अतिरिक्त अर्थसंकल्पावर अंबादास दानवे यांनी शुक्रवारी भाषण केले. भाषणादरम्यान शालेय गणवेशाबाबत टीका करताना त्यांनी सोबत आणलेले गणवेशाचे कापड सभागृहात दाखवले. याला सत्ताधारी पक्षातून मंत्री शंभूराजे देसाई, आमदार प्रवीण दरेकर यांनी जोरदार हरकत घेतली. तेव्हा दानवे यांनी इतका गदारोळ कशासाठी मी रिव्हॉल्व्हर आणले का, असा उलट प्रश्न विचारला. यावरुन सभागृहात जोरदार गदारोळाला सुरूवात झाली. तालिका सभापती विलास पोतनीस यांना त्याविषयी निर्णय घेण्यास सांगण्यात आले.

दरम्यान, सभापती डॉ. नीलम गो-हे या आसनस्थ झाल्या आणि त्यांनी नेमके काय झाले याची विचारणा केली. मंत्री देसाई यांनी घडलेला प्रकार सभापतींना सांगितल्यावर त्यांनी दानवे यांनी पूर्वपरवानगी न घेता सभागृहात बाहेरील वस्तू आणल्याबद्दल दानवे यांना समज देत पुन्हा असे न करण्यास सांगितले.

दानवे तुमच्या मागल्या प्रकारामुळे (लाड यांना अपशब्द उच्चारणे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना माफी मागावी लागली. तुमच्यामुळे पक्षप्रमुखांनी माफी मागावी, हे काही बरे नाही. याआधी साहेबांनी कधीही माफी मागितली नव्हती. तुम्ही त्यांच्यावर पुन्हा माफी मागण्याची वेळ आणू नका हे तुमच्या राजकीय कारकिर्दीसाठीही चांगले नाही, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या. तसेच तुम्ही काहीही सभागृहात बोलता तुम्हाला असे दाखवायचे आहे का, की तुम्हाला कोणीही काहीही बोलू शकत नाही, असाही प्रश्न गो-हे यांनी उपस्थित केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR