मुंबई : प्रतिनिधी
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वत:च्या बळावर निवडणूका लढविण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने विविध चर्चांना तोंड फुटले आहे.
दरम्यान, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेमकी काय चर्चा झाली याचा तपशिल समजू शकलेला नाही. शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे उभयनेत्यांत चर्चा झाली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे जयंत पाटील, आमदार रोहित पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.
या बैठकीत बीड प्रकरणासह अनेक विषयांवर राजकीय घडामोडींवर भेटीमध्ये चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. विधानसभेच्या निवडणूकांत महाविकास आघाडीला यश मिळालेले नाही या पार्श्वभूमीवर महानगर पालिक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीला महत्व आलेले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचा विधानसभा निवडणूकीत मोठा मानहाणीकारक पराभव झाला आहे. त्यामुळे येणा-ंया महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूका स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निवडणूकांत शिवसेना स्वत:च्या ताकद आजमावून पाहणार आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे निवडणूका लढविण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याचे म्हटले जात आहे. यात विधानसभा निवडणूकांमधील पराभवानंतर आता इंडिया आघाडीची विश्लेषण करणारी बैठक झालेली नसल्याचे म्हटले जात आहे. महाविकास आघाडीची संयुक्त बैठक अद्याप आयोजित केलेली नाही. यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.