22.8 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमुख्य बातम्याउपराष्ट्रपतींविरूद्ध अविश्वास प्रस्ताव

उपराष्ट्रपतींविरूद्ध अविश्वास प्रस्ताव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यसभेमध्ये सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी मोर्चेबांधणी केली असून, धनखड यांना पदावरून हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. विरोधी पक्षांकडून आज दुपारी १ वाजून ३७ मिनिटांनी राज्यसभेच्या सेक्रेटरी जनरल यांच्याकडे याबाबतचा प्रस्ताव दिला आहे. उपराष्ट्रपदी जगदीप धनखड यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर एकूण ६० सदस्यांच्या सह्या आहेत.

विरोधी पक्षांनी घटनेतील कलम ६७-बी अन्वये धनखड यांना उपराष्ट्रपतीपदावरून हटवण्याची मागणी करत राज्यसभेमध्ये प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असलेल्या उपराष्ट्रपतींना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी सादर करण्यात आला आहे. मात्र विरोधकांनी आणलेल्या या प्रस्तावावर सोनिया गांधी आणि अन्य कुठल्याही पक्षाच्या सभागृह नेत्यांच्या सह्या नाहीत.

काँग्रेसकडून जयराम रमेश आणि प्रमोद तिवारी यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे नदीम उल हक आणि सागरिका घोष यांनी हा प्रस्ताव राज्यसभेच्या सेक्रेटरी जनरल यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राज्यसभेचे सभापती असलेले जगदीप धनखड हे सभागृहात आपल्याला बोलू देत नाहीत, असा आरोप या प्रस्तावामधून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR