लातूर : प्रतिनिधी
रॉबिन हूड आर्मी ही शून्य पैसे घेऊन चालवण्यात येणारी स्वयंसेवी संघटना असून ती उपाशीपोटी राहणा-या लक्षावधी लोकांना हॉटेल्स आणि मोठ्या कार्यक्रमात शिल्लक राहणारे अन्न संकलित करुन ते पुरविण्याचे काम करते. या संघटनेला समाजातील विविध घटकातील लोकांनी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन लातूर रॉबिन हूड टीमच्या डॉ. ऊर्वी नागुरे यांनी शनिवारी लातुरात पत्रकारांशी बोलताना केले.
देशात ४०६ हुन अधिक शहरात अडीच लाखांहून अधिक सक्रिय सदस्य असणारी रॉबिन हूड आर्मीने आपला दहा वर्षांचा कालखंड पूर्ण केला आहे. या दशकपूर्तीचे औचित्य साधून रॉबिन हूड आर्मीच्या लातूर टीमच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. उर्वी नागुरे यांनी समाजाकडून एकही पैसा रोखीने न घेणा-या या संघटनेच्या कार्याविषयी विस्तृत अशी माहिती दिली. लातुरात या संघटनेचे काम मागच्या सहा वर्षांपासून अविरतपणे सुरु आहे. संघटनेत सेवाभावी वृत्तीने काम करणारे अनेक सदस्य असून त्यांना ‘रॉबिन’, असे संबोधले जाते.
हे रॉबिन हॉटेल्स, मंगल कार्यालय, मोठ्या समारंभातून ताजे अन्न संकलित करुन ते गरजूंपर्यंत पोहचवितात, असे सांगून डॉ. नागुरे म्हणाल्या की, लातूरच्या टीममध्ये वयाच्या सहाव्या वर्षांपासून ते पन्नास वर्षे वयापर्यंतचे रॉबिन कार्यरत आहेत. वाया जाणारे अन्न आम्हाला फोन आल्यापासूनच्या एका तासात संकलित करुन ते गरजूंपर्यंत पोहचवले जाते. या संघटनेचा हेतू केवळ उपाशी असलेल्यांना अन्न उपलब्ध करुन देणे एवढाच नसून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणे हाही आहे. ज्या मुलांना शिक्षण मिळत नाही, त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे उघडण्याचे कामही केले जात आहे. समाजातील विविध स्तरातील नागरिकांकडून ज्वारी, गहू, तांदूळ, डाळी , साखर, गूळ , शेंगदाणे, गोडेतेल असे अन्नधान्य संकलित करुन ते गरजू कुटुंबांपर्यंत पोहचविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
रॉबिन नवनाथ खांडेकर यांनी रॉबिन हूड आर्मीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढून देण्यात आले. तसेचत्यांच्या शिक्षणाचीही सोय करून देण्यात आली आहे. आपल्या टीमच्या प्रयत्नांमुळे दहावीच्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपर्यंत गुण मिळवले असल्याचे त्यांनी नमूद
केले. संघटनेच्या दशकपूर्ती निमित्त येत्या २५ ऑगस्टला लातुरात राजस्थान विद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदे प्रसंगी प्रसाद बावगे, संगमेश येवणगे, पवन भोसले, कृष्णा देशमुख, वल्लभ अंधारे, अॅड. उमर शेख यासह अनेक रॉबिन उपस्थित होते.