16.3 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeसोलापूरउसाला तुरा आल्याने वजनात घट

उसाला तुरा आल्याने वजनात घट

सोलापूर : यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील साखर कारखाने उशिरा सुरू झाले आहेत. त्यातच उसाला तुरा आल्याने त्याच्या सरासरी वजनात घट होण्याची शेतकऱ्यांना भीती वाटत आहे. ऊस उत्पादक शेतकरी तुरा आलेल्या उसाची तोड कारखान्याकडून वेळेत व्हावी, अशी मागणी करत आहे.

सध्या बारा महिन्यांचा काळ उलटलेल्या उसाला तुरा आला आहे. तुरा आल्याने उसामध्ये पोकळी तयार होत असते. यामुळे वजनात घट होण्याची भीती आहे. लवकर ऊस कारखान्याला पाठवण्यासाठी शेतकरी अटापिटा करताना दिसत आहेत. कारण वजन कमी झाले की, सरासरी उताराही कमी पडतो.

अशी शंका शेतकरी व्यक्त करत आहेत. ऊस अडवा तिडवा पडल्याने पुन्हा त्याला फुटवा फुटतो. म्हणून ऊस उत्पादक शेतकरी ऊस दराच्या आंदोलनापेक्षा वावरातील ऊस कारखान्याला घालण्यासाठी विविध कारखान्याच्या चिटबॉयकडे चौकशी करण्यात व्यस्त आहेत. उशीर झाला की पुन्हा तुरा वाढण्याची भिती आहे. आता दिवसेंदिवस उन वाढण्याची सुद्धा चिंता सतावत आहे.

अनेक साखर कारखान्याकडे टोळ्या कमी आहेत. साखर कारखान्यांकडे व ऊस वहातूक मालकांकडे हॉर्वेस्टर मशिन वाढल्या आहेत. जिथे मशीनने ऊसतोडीला अडचण आहे, अशा ठिकाणी व आडवा तिडवा पडलेल्या उसाची तोड करण्यासाठी टोळीच लागते. टोळ्यांची संख्या कमी आहे. जिथे काळी माती आणि भुसभुशीत जमीन आहे, अशा जमिनीतही मशीन चालत नाही, तेथेही टोळीच लागते. कारण येथे मशीन जमिनीत रूतण्याची भीती असते.

त्यामुळे उसाची वेळेवर तोड होण्यात अडचणी येत आहेत. कारखान्याकडून ऊसतोड कार्यक्रमानुसार तोड सुरू असते; पण या वर्षी ज्याच्या उसाला तुरा आली अशा उसाच्या तोडीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

कारखान्याने शेतकऱ्याचे हित पहावे. हंगाम उशिरा सुरू झाल्याने तोडीलाही उशीर होत आहे. यामुळे उसाला तुरा आला आहे. कारखान्याने तुरा आलेला ऊस तोडण्यास प्राधान्य द्यावे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होईल.अशी मागणी ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR