29.2 C
Latur
Saturday, November 16, 2024
Homeमुख्य बातम्या‘एसटी’ची ‘एलएनजी’ बस येणार; महामंडळाची ९७० कोटींची मागणी

‘एसटी’ची ‘एलएनजी’ बस येणार; महामंडळाची ९७० कोटींची मागणी

मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील ५००० डिझेल बसेसचे रूपांतर ‘एलएनजी’ बसेसमध्ये टप्प्याटप्प्याने होणार आहे. द्रवरुप नैसर्गिक वायू इंधनावर धावणा-या या बसेस एसटीच्या जुन्या बसेसच्या चेसिसवरच बांधण्यात येणार आहेत. या बसेसच्या बांधणीसाठी प्रत्येक बस मागे १९.४० लाख रुपये खर्च येणार आहे. या संदर्भातील निर्णयाला एसटी महामंडळाने अखेर मंजुरी दिली आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे निधी देण्याची विनंती देखील करण्यात आली आहे.

२०२३-२०२४ सालच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री अजित पवार यांनी हरित परिवहनाला चालना देण्यासाठी ५ हजार डिझेल बसेसचे द्रवरुप नैसर्गिक वायू इंधनावरील वाहनांमध्ये रुपांतर करण्याचे जाहिर केले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दि.२२ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या ३०३ व्या बैठकीत पर्यायी इंधनावर चालणा-या वाहनांमध्ये रुपांतरण करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. यानुसार प्रति बस रु.१९.४० लाख प्रमाणे ५००० वाहनांसाठी एकूण रु.९७० कोटी निधी महाराष्ट्र शासनाकडून मागण्यासाठी संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसस्थानकांच्या आधुनिकीकरणांतर्गत बांधकाम आणि इतर सोयी सुविधेसाठी भांडवली मालमत्तेच्या निर्मितीकरीता अनुदान या लेखाशीर्षाखाली त्या-त्या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून खर्च करण्यात येणार आहेत. यासाठी सन २०२४-२०२५ मध्ये रु.४० कोटी, सन २०२५-२०२६, मध्ये रु.२०० कोटी, सन २०२६- २०२७ मध्ये रु.३७० कोटी, आणि सन २०२७-२०२८ मध्ये रु.३६० कोटी असा एकूण रु.९७०.०० कोटी रुपयांच्या निधीचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR