28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमुख्य बातम्याएसटी महामंडळातील बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार

एसटी महामंडळातील बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार

 

मुंबई : प्रतिनिधी
राज्य महामार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळामध्ये काम करणा-या चालक-वाहकांपासून अधिका-यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. त्यामुळे बदल्यांबाबतचे विविध आक्षेप कमी होणार असून सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचा-यांना समान न्यायाची हमी या नव्या पध्दतीने शक्य होणार आहे.

एसटी महामंडळामध्ये चालक-वाहकापासून अधिका-यांपर्यंत सुमारे ८७ हजार कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. एक मध्यवर्ती कार्यालय, सहा प्रदेश, त्या प्रदेशांतर्गत ३१ विभाग आणि या विभागांतर्गत कार्यरत असलेले २५१ आगार आहेत. या बरोबरच तीन मध्यवर्ती कार्यशाळा, ९ टायर पुनस्त:रण प्रकल्प आणि एक मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था असा एसटी महामंडळाचा अवाढव्य पसारा आहे.

या सर्व आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी गंभीर आजारपण, पती-पत्नी एकत्रीकरण, आपापसातील बदली अशा अनेक कारणास्तव विनंती बदलीचे अर्ज त्यांच्या कार्यालयीन प्रमुखांकडे सादर करतात. परंतु विविध प्रकारच्या हस्तक्षेपामुळे, बदल्यांमध्ये अनियमितता होत असते. परिणामी, कर्मचा-यांना न्याय ­मिळत नाही. सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचा-यांना समान न्याय मिळण्याच्या हेतूने महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्या विशेष पुढाकाराने बदल्या संदर्भातील संगणकीय प्रणालीव्दारे अ‍ॅप एसटी महामंडळाकडून विकसीत करण्यात येत आहे.

तीन पर्याय देण्याची मुभा
या अ‍ॅपव्दारे विभागांतर्गत एका आगारातून दुस-या आगारात, प्रदेशांतर्गत एका ­विभागातून दुस-या विभागात विभागात आणि राज्यात एका प्रदेशातून दुस-या प्रदेशात विनंती बदलीचे (एकाच पदात १ वर्ष पुर्ण झालेल्या कर्मचा-यांचे) अर्ज भरून घेण्यात आले आहेत. संबंधित कर्मचा-याला विनंती बदलीमध्ये तीन पर्याय देण्याची मुभा देण्यात आलेली आहे. कर्मचा-यांना समान न्याय देण्याबरोबरच महामंडळाच्या मनुष्यबळाचा क्षेत्रनिहाय समसमान वापर करण्यासाठी देखील हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे. लवकरच या संगणकीय अ‍ॅपव्दारे बदलीची प्रक्रीया सुरू करण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR