भुवनेश्वर : वृत्तसंस्था
विषारी दारूच्या प्राशनामुळे झालेल्या मृत्यूंवरून आज ओडिशाच्या विधानसभेमध्ये विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. विरोधी पक्षांमधील काही आमदार एवढे आक्रमक झाले की, त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे धाव घेतली. तसेच अध्यक्षांच्या आसनाला घेराव घातला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत असून, या व्हिडीओमध्ये विधानसभेच्या अध्यक्षांच्या आसनाभोवती आमदार गोळा झाल्याचे आणि सुरक्षा रक्षक त्यांना दूर लोटत असल्याचे दिसत आहे.
ओडिशा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, आज (शुक्रवार) कामकाजाला सुरुवात झाल्यावर विरोधी पक्षांनी विषारी दारुमुळे झालेल्या मृत्यूंचा मुद्दा उपस्थित केला. तसेच मुख्य विरोधी पक्ष असलेल्या बीजेडी आणि काँग्रेसचे नेते वेलमध्ये उतरले. त्यांनी गंजम जिल्ह्यातील विषारी दारू कांडावरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच राज्याच्या अबकारी कर मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुरमा पाढी ह्या ओडिशाच्या विधानसभेच्या अध्यक्षा आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओडिशामध्ये भाजपला पहिल्यांदाच बहुमत मिळाले होते. त्यानंतर सुरमा पाढी यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली होती.