23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरकच-याने गुदमरतोय झाडांचा जीव 

कच-याने गुदमरतोय झाडांचा जीव 

लातूर : प्रतिनिधी
शहरातील जवळपास सर्वच मुख्य रस्त्यांवर रस्ता दुभाजक आहे. शहराचे सौंदर्य वाढावे त्यासोबत शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित दिसावे याकरीता महानगरपालिकेच्या वतीने सर्वच दुभाजकांमध्ये सुशोभीत झाडे लावण्यात आली आहेत. परंतु, रस्ता दुभाजक कचरा कुंडी बनल्याने झाडांचा जीव गुदमरत आहे. दुभाजकात कचरा टाकल्याने दुभाजकात झाडे कमी कचराच जास्त, अशी अवस्था झाली आहे. स्वच्छ, सुंदर आणि हरित लातूरऐवजी विदु्रपच जास्त दिसत आहे.
लातूर शहर महानगरपालिकेने शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे जनाधार सेवाभावी संस्थेसोबत करार केलेला आहे. शहरातील घनकच-याचे संकलन या संस्थेमार्फत केले जाते. कचरा संकलनासाठी या संस्थेकडे सुमारे ६५० कचरावेचक कामगार आहेत. महानगरपालिकेकडून या संस्थेला दरमहा करारानूसार १ कोटी ४० लाख रुपये दिले जातात. मात्र घनकचरा व्यवस्थापन करणारी संस्था शहरातील कच-याचे व्यवस्थापन निटपणाने करीत नसल्याने कच-याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. घरोघरी जाऊन होणारे कचरा संकलन, रस्त्यावर पडणारा कचरा उचलणे याबाबी नियमित होत नाहीत. कधी कचरा संकलन यंत्रणा ठप्प होते तर कधी हतबल. शहरातील कचरा संकलन ठप्प झाले की, जागोजागी कच-याचे ढिग साचतात. बंद पडलेले कचरा स्पॉट पुन्हा वाढत जातात.
शहरातील घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे आवश्यक असताना यात कुचराई केली जाते. घंटागाडीच दारावर येत नाही तेव्हा नागरिक घरात साठवून ठेवलेला कचरा रस्त्यावर फेकतात. कचरा टाकण्याचे प्रमाण वाढते आणि सर्वत्र कचराच कचरा दिसु लागतो. रयतू बाजारातील कचराही रस्त्यावरच टाकला जातो. शहरातील महात्मा गांधी चौकात विविध प्रकारचे खाद्य पदार्थांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात. चहा, पाणी, नाष्ट्यापासून ते जेवणापर्यंत सर्वच या चौकात उपलब्ध आहे. व्यवसायिक दिवसभर व्यवसाय करुन हॉटेल, हातगाडीवरील खरखटे, घाण पाणी रस्त्यावर टाकुन निघुन जातात. त्यामुळे दिवसभर या चौकात दुर्गंधी, डास, माश्याचा प्रादुर्भाव असतो. याकडे कोणीच लक्ष देत नाही.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पीव्हीआर चौक, अंबाजोगाई रोड, औसा रोड, मेन रोड या मुख्य रस्त्यांवरील दुभाजकांत शहर सुशोभीत, स्वच्छ, सुंदर आणि हरित दिसावे म्हणून झाडे लावण्यात आलेली आहेत. परंतू, व्यवसायिक सर्रासपणे या रस्ता दुभाजकात कचरा टाकतात. मनासह कोणतीही यंत्रणा दुभाजकांतील कचरा काढत नाही. परिणामी रस्ता दुभाजकांची कचरा कुंडी झाली आहे. रस्ता दुभाजकांत झाडे कमी आणि कचरा जास्त, अशी परिस्थिती आहे. कचरा आणि धुळीने झाडांची पाने माखली आहेत. त्यामुळे असंख्य झाडांचा जीव या कच-यामुळे गुदमरतो आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR