26.8 C
Latur
Friday, April 4, 2025
Homeमहाराष्ट्रकबुतरांना दाणे टाकल्यास दंड

कबुतरांना दाणे टाकल्यास दंड

मुंबई : भूतदया म्हणून प्राण्यांना, पक्ष्यांना अन्न खाऊ घालत असाल तर यापुढे पालिका तुम्हाला ५०० रुपये दंड करणार आहे. कबुतर, कुत्री, मांजरी, गायी यांना सार्वजनिक ठिकाणी कोणी खाऊ घालत असेल आणि त्याचा इतरांना त्रास होत असेल तर अशा प्रकरणात ५०० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. पालिकेच्या घनकचरा विभागाच्या नव्या नियमावलीत ही तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. याबाबत येत्या काळात कठोर कारवाई करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे.

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन आरोग्य आणि स्वच्छता उपविधी २००६ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीचा मसुदा १ एप्रिल रोजी मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २००६ हे सध्या लागू आहेत. या उपविधीमध्ये कालसुसंगत तसेच विविध शासकीय, प्रशासकीय बदल करून नवीन मसुदा तयार करण्यात आला आहे. त्यात रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी प्राणी-पक्ष्यांना खाऊ घालणा-यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर येथील कबुतरखाना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच इतरत्रही अनेक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकून अनधिकृत कबुतरखाने सुरू झाल्याबद्दल नागरिक समाजमाध्यमावर संताप व्यक्त करत असतात. मांजरींना, श्वानांना रस्त्यावर खाऊ घालणा-यांवरूनही अनेकदा वाद होत असतात.

मनसेच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी सांगितले, मुंबईत विविध ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृतपणे कबुतरखाने उभे राहिले आहेत. समुद्रकिना-यांवर कबुतरांसाठी धान्य विकत बसणा-यांची संख्या वाढली आहे. हे धान्य विकत घेऊन तेथेच कबुतरांसाठी टाकले जात असल्यामुळे कबुतरांची संख्या वाढते आहे. ही कबुतरे मग आजूबाजूच्या रहिवासी इमारतीच्या खिडक्यांमध्ये घर करतात. त्यामुळे त्यांच्या विष्ठेतून व पिसांमधून श्वसनाचे आजार पसरत आहेत. लोकांच्या जिवाशी खेळणारे हे अनधिकृत कबुतरखाने बंद झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे, असेही त्यांनी सांगितले. हिंदुजा रुग्णालयाजवळ समुद्रकिना-यावर असाच कबुतरखाना अनधिकृतपणे तयार होत होता, तो बंद करण्यात आला आहे. कबुतरांना दाणे घालू नयेत असा पालिकेचा फलक असून त्या खालीच दाणे, गाठ्या विकणारा इसम बसत होता अशीही माहिती शृंगारपुरे यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR