25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमुख्य बातम्याकराडविरोधातही मोक्का

कराडविरोधातही मोक्का

देशमुख खून प्रकरणी गुन्हा, सीआयडीने मिळविला ताबा

बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात मास्टरमाईंडचा ठपका असलेल्या वाल्मिक कराडवर अखेर आज मोक्का लावण्यात आला. खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडची १४ दिवसांची पोलिस संपल्याने आज बीडच्या केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने मोठा निर्णय देत वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला आहे. तसेच कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, सीआयडीने देशमुख खून प्रकरणी वाल्मिक कराडला ताब्यात घेतले. देशमुख हत्या प्रकरणाच्या कटात सहभागी असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर आहे.

दरम्यान, त्याच्यावर दाखल असणा-या खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याला जामीन मिळण्याची शक्यता आहे. ज्यावर उद्या (बुधवारी) सुनावणी होणार आहे. मात्र, संतोष देशमुख हत्या प्रकरणी कराडच्या अडचणी वाढल्या आहेत. मोक्काअंतर्गत कराडला सीआयडी कोठडी मिळाली तर तो कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. कराडवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर एसआयटीने प्रोडक्शन वॉरंट दाखवून त्याचा ताबा घेतला. देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा पुरावा असल्याचा दावा एसआयटीने केला आहे. या आधी खंडणीच्या गुन्ह्यातही एसआयटीकडेच त्याचा ताबा होता. आता हत्येच्या प्रकरणात त्याला ताब्यात घेतले.

तत्पूर्वी, कराडला केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर कराडला खंडणी प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, सीआयडीने अर्ज केल्यानुसार उद्या कराडला केज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. एकीकडे सीआयडीने कोठडीची मागणी केली तर दुसरीकडे कराडांच्या वकिलांनी खंडणी प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला आहे.

दरम्यान, कराडवर मोक्का लागल्याने तपासाची चक्रे फिरणार आहेत. ज्यामध्ये कलम ३०२ अंतर्गत संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. परंतु वाल्मिक कराड अद्याप खून प्रकरणी दोषी ठरलेला नाही. असे असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला असता मोक्काअंतर्गत त्याला जामीन मिळण्याची शक्यता धुसर आहे. मोक्काअंतर्गत सत्र न्यायालयाकडून जामीन दिला जात नाही. मोक्काअंतर्गत गुन्ह्यात विशेष न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज करावा लागतो. कराडला उद्या सीआयडी कोठडी मिळाल्यास जामीन मिळणे कठीण असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

कराडची तब्येत बिघडली
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने वाल्मिक कराडला ताब्यात घेतल्यानंतर त्याची अचानक तब्येत बिघडली. त्याला थकवा जाणवत असून, छातीत दुखू लागले आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वाल्मिक कराडच्या काही चाचण्या केल्या जात आहेत.

परळीत कडकडीत बंद, ठिय्या आंदोलन
वाल्मिक कराडला मोक्का लावल्याने समर्थक आक्रमक झाले आहेत. मंगळवारी सकाळपासूनच परळीत कराड समर्थकांनी आंदोलन केले. कुठे समर्थक टॉवरवर चढले आहेत तर कुठे जाळपोळ केली. कराड समर्थकांनी परळी बंदचीही हाक दिली होती. ऐन संक्रांतीच्या दिवशी परळीत बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे परळीत शुकशुकाट पाहायला मिळाल्या. कराड समर्थकांनी तर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान, कराडच्या मातोश्री सकाळपासून परळी येथे ठिय्या आंदोलनाला बसल्या होत्या. मात्र, त्यावेळी पारुबाई कराड यांचीही प्रकृती बिघडली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR