कळंब : सतीश टोणगे
नांदगाव विधानसभेची लढत हाय व्होल्टेज होत आहे. येथे मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. ते विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात उभे आहेत. सुहास कांदे यांचा पराभव करण्यासाठी त्यांनी कळंब तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुहास कांदे यांचा शोध घेऊन त्यांचा पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने एका रात्रीत सुहास हिरो होऊन राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा राजीनामा देऊन विद्यमान आ. सुहास कांदे यांच्या विरोधात दंड थोपटले. राज्यात सुहास कांदे नावाचा दुसरा कोणी व्यक्ती भेटतो का याचा शोध भुजबळ घेत होते, त्यावेळी कळंब तालुक्यातील सापनाई येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सामाजिक कार्यकर्ते असलेले सुहास कांदे यांच्याशी संपर्क झाला.
कळंब येथील सुहास कांदे हे नेहरू युवा केंद्रामध्ये राष्ट्रीय सेवा कर्मी होते. युवक मंडळाच्या माध्यमातून ते सामाजिक कामात सहभागी असतात. ग्रामीण पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सुहास कांदे या तरुणाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ते आमदार व्हावेत अशा शुभेच्छा सर्वजण देत आहेत.