38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeलातूरकष्टक-यांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न

कष्टक-यांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहराची सर्वांगीण प्रगती होत असताना कष्टक-यांच्या  जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांना अन्न, वस्त्र, निवारा यासह आरोग्य, शिक्षण व इतर सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न राहील. लातूरच्या अर्थकारणाचा आत्मा असलेल्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचा लौकिक आणि वैभव वाढवण्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते सर्व काही केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मार्केट यार्डमधील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी दि. १४ मार्च रोजी दिल.ी.
अध्यक्षस्थानी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, माजी सभापती ललितभाई शहा, विलास बँकेचे अध्यक्ष किरण जाधव, उपाध्यक्ष समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, सभापती जगदीश बावणे, उपसभापती, सुनील पडीले, सचिव भगवान दुधाटे सर्व संचालक मंडळ, शेतकरी, ज्येष्ठ व्यापारी त्यांच्यासह बाजार समितीमधील सर्व घटकांचे प्रतिनिधी, मान्यवर मंडळी या वेळी उपस्थित  होते. या वेळी पुढे बोलताना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, बाजार समितीमधील व्यवहारावर लातूरमधील इतर क्षेत्रांतील व्यवसाय आणि व्यापार अवलंबून आहेत त्यामुळे भविष्याचा विचार करून या ठिकाणी नव्याने सोयीसुविधा निर्माण करण्यासंदर्भात सर्वांच्या सूचना घेऊन संचालक मंडळाने या पुढे निर्णय घेऊन त्यावर लगेच अंमलबजावणी करावी.
शेतीमाल निर्माण होऊन तो बाजारपेठेपर्यंत व्यवस्थित पोहोचण्यासाठी, ठिकाणी गोडावून, कोल्ड स्टोरेज आणि वाहतुकीच्या व्यवस्था उभाराव्यात, बाजार समितीमार्फत मुलींचे वसतिगृह बांधून पूर्ण झाले आहे. हे  वसतिगृह बांधण्यासाठी ज्या व्यापा-याने आपली दुकाने दिली त्यांना नवीन दुकाने त्वरित उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कारवाई करावी. बाजार समिती परिसरात आणखी ज्या ठिकाणी आवश्यक आहे तेथे रस्ते, नाल्या बांधण्यासंदर्भात तसेच कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठ्याची सुविधा, सीसीटीव्ही, पथदिवे या संदर्भात  येथील सर्व घटकांशी विचार  विनिमय करून निर्णय घ्यावेत. काळाची गरज ओळखून वेळ न दवडता नवीन बाजार समिती उभारणीच्या कामालाही आता  सुरुवात करण्यात येणार  आहे. कालबद्ध कार्यक्रम आखून बाजार टप्प्याटप्प्याने नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची योजना राबवावी.
बाजार समिती स्थलांतरित झाल्यानंतर त्या ठिकाणीही लातूरची गरज लक्षात घेऊन गंज गोलाईच्या धरतीवर अद्ययावत, सुसज्ज व्यापार पेठ उभारण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही संचालक मंडळाला या प्रसंगी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख दिल्या आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती जगदीश बावणे यांनी करून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर अनंतवाड व अरविंद पाटील  यांनी केले तर शेवटी आभार संचालक युवराज जाधव यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR