23.5 C
Latur
Wednesday, September 25, 2024
Homeमहाराष्ट्रकांदा, टोमॅटो, बटाट्याच्या किमतीत मोठी वाढ

कांदा, टोमॅटो, बटाट्याच्या किमतीत मोठी वाढ

सर्वसामान्यांना महागाईचा फटका

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसत आहे. जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याचे दिसत आहे. असे असताना आता टोमॅटो आणि कांद्याचे भाव आणखी वाढणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे खिशाला आणखी कात्री लागणार आहे. देशातील काही भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. हे यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

टोमॅटोच्या किमती एक वर्षापूर्वीच्या तुलनेत सुमारे १४ टक्के वाढल्या आहेत. त्याच वेळी, सप्टेंबरमध्ये आतापर्यंत कांद्याचे भाव ११ टक्के वाढले आहेत आणि ५० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. सप्टेंबरमध्ये प्रामुख्याने कांदा आणि टोमॅटोच्या किमती वाढल्या आहेत. कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्यानंतर भाव वाढले आहेत. त्यामुळे सरकारला किंमत स्थिरीकरण निधीतून विक्री करणे आवश्यक झाले आहे.
तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये जास्त पाऊस झाला आहे. याचा परिणाम शेतीवर झाला असून, पिकांचे नुकसान झाले आहे. खाद्यपदार्थांच्या, विशेषत: भाज्यांच्या किमती वाढल्या आहेत. खाद्यतेलावरील वाढीव सीमाशुल्काचा परिणाम झाल्याचे दिसत आहे. आता किरकोळ किमतींवरही दिसून येत आहे.

आरबीआयने अलीकडेच ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये भाज्यांच्या किमतीत घट नोंदवली आहे. एकूण पेरणी जवळपास पूर्ण झाल्यामुळे आता लक्ष कापणीच्या हंगामाकडे वळवले जाईल. सामान्यपेक्षा जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे आणि अन्नधान्य महागाई वाढण्याचा धोकाही आहे. १८ सप्टेंबरपर्यंतचा पाऊस हंगामातील सरासरीपेक्षा ७ टक्के जास्त आहे.

टोमॅटो ७० रुपये किलो
कांद्याचे भाव वाढल्यानंतर आता टोमॅटोचेही दर वाढताना दिसत आहेत. १५ दिवसांपूर्वीपर्यंत टोमॅटो २० ते ३० रुपये किलोने बाजारात मिळत होते. तर टोमॅटोचे दर आता ५० ते ७० रुपये किलोवर पोहोचले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारनेही टोमॅटोच्या दरावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. टोमॅटोचे दर वाढताच कांद्याच्या धर्तीवर टोमॅटो स्वस्त दरात विकण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. जेणेकरून सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR