26.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रकांदा प्रश्न पेटला!

कांदा प्रश्न पेटला!

कृषिमंत्र्यांच्या दारासमोरच आंदोलन निर्यात शुल्कावरून राजू शेट्टींचा इशारा

नाशिक : प्रतिनिधी
सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. कारण दिवसेंदिवस कांद्याच्या दरात मोठी घसरण होताना दिसत आहे. अशातच कांदा निर्यातीच्या मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कांद्याच्या निर्यातीवर लावलेले २० टक्क्यांचे निर्यात शुल्क तातडीने सरकारने हटवावे अन्यथा थेट कृषिमंत्र्यांच्या दारासमोरच आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिला आहे.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी २५ फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांच्या भेटी घेत चर्चा केली. यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. शेतक-याची भिका-याशी तुलना करण्यापेक्षा कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करा असे शेट्टी म्हणाले. सरकारने कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा करता येईल यावर अधिक भर देण्यासाठी प्रोत्साहनपर योजना जाहीर करण्याची मागणी देखील शेट्टी यांनी केली आहे.

कांद्याचे दर हे सातत्याने कमी होत आहेत. ३००० रुपयांनी विक्री होणारा कांदा २००० रुपयांवर आला आहे. आणखी दर कमी होण्याची शक्यता आहे. २० टक्क्यांहून अधिक कांद्याचे उत्पादन यावर्षी वाढण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. अशातच कारण नसताना सरकारने कांदा निर्यातीवर २० टक्के निर्यात शुल्क लावल्याचे राजू शेट्टी म्हणाले. त्यामुळे सरकारने आत्ताच उपाययोजना केल्या पाहिजेत. शेतक-याला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर निर्यात शुल्क हटवावे आणि निर्यातीला प्रोत्साहन द्यावे असे राजू शेट्टी म्हणाले. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतक-यांची भिका-याबरोबर तुलना करण्यापेक्षा कांदा निर्यात कसा होईल आणि निर्यातशुल्क कसे हटवता येईल हे पाहावे असे शेट्टी म्हणाले. केंद्राकडे पाठपुरावा करावा. कांद्याचे दर आणखी पडले तर कृषिमंत्र्यांच्या दारासमोरच आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

शेतक-यांचे मोठे नुकसान
कांदा दर घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून व सर्व राज्यातील शेतक-यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क पूर्णपणे रद्द करावे, अशी मागणी होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR