25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्र कीर्तन ही एक कला : डॉ. अभ्यंकर

 कीर्तन ही एक कला : डॉ. अभ्यंकर

पुणे : प्रतिनिधी
 कीर्तन ही कला असून त्यामध्ये दहा कलांचा संगम असायला हवा. मुख्य म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची पूर्तता होणे आवश्यक आहे.  हे काम सद्गुरू मोरेश्वर जोशी चल्होलीकर हे गेली ५० वर्षे अव्याहतपणे करीत आहेत असे गौरवोद्गार विद्या वाचस्पती आणि आदित्य प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. शंकर अभ्यंकर यांनी काढले.
 सद्गुरू मोरेश्वर जोशी चल्होलीकर यांचा अमृतमहोत्सवी सोहळा आणि कीर्तन क्षेत्रातील सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.
संकेश्वर करवीर पीठाचे शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती रा. स्व. संघ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ प्रांत संघचालक नाना जाधव कृतज्ञता सोहळा समिती अध्यक्ष वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले व्यासपीठावर होते. यावेळी कृतज्ञता गौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. विशेषाकांचे संपूर्ण काम प्रमोद पोटभरे यांनी केले. समितीच्या वतीने  महावस्त्र, पगडी आणि मानपत्र प्रदान करून जोशी यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वात १० कलांचा संगम झाला आहे असे नमूद करून ते म्हणाले, या कलांमध्ये काव्य, वाद्य, नृत्य, नाट्य, गायन, ताल, पाठांत,वक्तृत्व, बहुश्रुतता आणि शिष्टाचार यांचा समावेश आहे. हे असेल तर समाजप्रबोधन करता येणे शक्य असून त्यांनी लोकसंग्रह देखील केला आहे. संघाचे संस्कार त्यांच्यावर बालपणापासून झाले आहेत. यावेळी शंकराचार्य यांनी जोशी यांच्या आगामी कार्यासाठी आशीर्वाद दिले.
 सत्काराला उत्तर देताना जोशी यांनी सांगितले की, आजचा गौरव हा व्यक्तीचा नाही तर संस्काराचा, कार्याचा आणि या कार्यात सहभागी असणा-­या सर्वांचा आहे त्यामुळे हा सन्मान त्यांना समर्पित करतो आहे. सध्याच्या काळात आपण सर्वांनी एकत्रपणे काम करण्याची गरज आहे तसेच कीर्तन हे जगता आले पाहिजे त्या माध्यमातून समाजप्रबोधन देखील करण्याची सक्रियता असायला हवी, असे त्यांनी नमूद केले.
सुहास हिरेमठ यांनी मनोगतातून जोशी यांच्या कार्याचा गौरव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गीताव्रती संध्या कुलकर्णी यांनी गीतेतल्या १५ व्या अध्यायाचे पठण केले. गोडबोले शास्त्री यांनी प्रास्ताविक आणि स्मिता देशपांडे यांनी आभार मानले. अंजली क-­हाडकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरुवातीला ईशिता जोशीने शारदास्तवन सादर केले. कार्यक्रमाच्या मध्यंतरात सुहास देशपांडे यांनी मुलाखतीच्या माध्यमातून जोशी दाम्पत्याचा तसेच कीर्तन क्षेत्रातील  वाटचालीचा, रा. स्व. संघाच्या आठवणीचा प्रवास उलगडला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR