सोलापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्तृत्व काय? मला त्यांचा इतिहास बघायचाय. तुम्ही कुटुंब फोडले, पार्टी फोडली, तुकाराम महाराजांबद्दल बोलले गेले, शेतकरी आत्महत्या करतायेत, राज्यात गुंडाचे राज्य सुरू आहे, अशा स्थितीत तुम्ही शांत बसता. मग तुमचे हेच कर्तृत्व का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली. लोकसभेत लोकांनी जसं तुमचं कर्तृत्व धुऊन काढलं तसा विधानसभेलासुद्दा लोक तुम्हाला धडा शिकवतील असे रोहित पवार म्हणाले. इतिहासात कर्तृत्वाला स्थान असते असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर रोहित पवारांनी जोरदार टीका केली.
महाराष्ट्रातील स्वाभिमानी लोक तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीत दिल्लीचे बादशाह आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना ‘भटकती आत्मा’ असे म्हटले होते. मला त्यांना सांगायचे आहे की, शरद पवार हे भटकती आत्मा नाहीत, तर इथे असलेल्या सामान्य लोकांची, महाराष्ट्र धर्म टिकवणा-या लोकांची, स्वाभिमानी लोकांची पवारसाहेब आत्मा आहेत, असे रोहित पवार म्हणाले. आमचा महाराष्ट्र आमचा स्वाभिमान आहे. त्यामुळे तुम्ही कितीही ताकद लावली तरी महाराष्ट्रातील स्वाभिमानी लोक तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नसल्याचे रोहित पवार म्हणाले. बार्शीत शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी रोहित पवार बोलत होते.
लाडकी बहीण योजना ही चुकीची नाही. पण या योजनेची व्याप्ती वाढली पाहिजे असे रोहित पवार म्हणाले. दुधाचं अनुदान अनेक शेतक-यांना अद्याप मिळालं नाही. दोन महिन्यांनंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. त्यानंतर योजनांची व्यापी वाढवणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.