25.3 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeक्रीडाकेकेआरने तिस-यांदा जिंकली आयपीएल

केकेआरने तिस-यांदा जिंकली आयपीएल

हैदराबादची उडविली दाणादाण, अंतिम सामन्यात ११३ धावांत खुर्दा
चेन्नई : वृत्तसंस्था
केकेआरने चॅम्पियन्सला साजेसा खेळ करत आयपीएल २०२४ च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. केकेआरच्या गोलंदाजांनी या विजयात सिंहाचा वाटा उचलला. अचूक गोलंदाजी करत त्यांनी हैदराबादच्या डावाचा फक्त ११३ धावांत खुर्दा उडवला. त्यामुळे आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यासाठी केकेआरला ११४ असे माफक आव्हान हवे होते. केकेआरने हे आव्हान लीलया पेलले आणि त्यांनी तिस-यांदा आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली.

केकेआरने यावेळी हैदराबादचे पानीपत केल्याचे पाहायला मिळाले. कारण या संपूर्ण सामन्यात केकेआरने वर्चस्व राखल्याचे पाहायला मिळाले. केकेआरने या सामन्यात हैदराबादवर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. हैदराबादच्या ११४ धावांचा पाठलाग करताना केकेआरला सुरुवातीलाच धक्का बसला तो सुनील नरेनच्या रुपात. पॅट कमिन्सने त्याला ६ धावांवर असताना बाद केले. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या व्यंकटेश अय्यरने धडाकेबाज फलंदाजी केली. व्यंकटेशला यावेळी सलामीवीर रहमतुल्लाह गुरबाजने चांगली साथ दिली. त्यामुळे यावेळी केकेआरला सहजपणे विजय मिळवता आला. गुरबाज यावेळी ३९ धावांवर बाद झाला. पण व्यंकटेशने अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला.

केकेआरने पहिल्याच षटकापासून हैदराबादला धक्के द्यायला सुरुवात केली. मिचेल स्टार्कने पहिल्या षटकात भन्नाट चेंडू टाकत अभिषेक शर्माला बाद केले. त्याला फक्त दोनच धावा करता आल्या. त्यानंतर दुस-या षटकात केकेआरने पुन्हा हैदराबादला धक्का दिला. यावेळी केकेआरने हैदराबादचा धडाकेबाज सलामीवीर ट्रेव्हिस हेडला माघारी धाडले. तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर पुन्हा एकदा स्टार्कने हैदराबादला धक्का दिला. स्टार्कने राहुल त्रिपाठीला ९ धावांवर बाद केले आणि संघाला तिसरे यश मिळवून दिले.

केकेआरने एकवेळ हैदराबादची ३ बाद २१ अशी अवस्था केली होती. त्यानंतर हैदराबादकडून चौथ्या विकेटसाठी २६ धावांची भागीदारी झाली. त्यामुळे हैदराबादचा संघ स्थिरस्थावर होणार, अशी आशा त्यांच्या चाहत्यांना वाटत होती. पण त्याचवेळी केकेआरच्या मदतीला धावून आला तो हर्षित राणा. राणा यावेळी फक्त एका विकेटवर थांबला नाही तर त्याने हैदराबादला दोन मोठे धक्के दिले. सुरुवातीला राणाने नितिष कुमार रेड्डीला बाद केले, त्याला १३ धावा करता आल्या. त्यानंतर राणाने केकेआरसाठी धोकादायक वाटत असलेल्या हेन्रीच क्लासिनला बाद केले, त्याला १६ धावांवर समाधान मानावे लागले.

आंद्रे रसेलनेही यावेळी दोन विकेट्स मिळवल्या. रसेलने प्रथम एडन मार्करमला २० धावांवर बाद केले. त्यानंतर केकेआरसाठी धोकादायक ठरत होता, तो हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स. कारण कमिन्सने यावेळी दमदार फलंदाजी करत २४ धावा केल्या होत्या. पण रसेलने त्याला बाद केले आणि संघाला मोलाची विकेट मिळवून दिली.

केकेआरच्या गोलंदाजांनी यावेळी अचूक आणि भेदक मारा केला. त्यामुळेच केकेआरला यावेळी हैदराबादला ११३ धावांत रोखता आले आणि विजयाचा भक्कम पाया रचता आला. केकेआरकडून रसेलने सर्वाधिक तीन विकेट्स मिळवल्या. रसेलला यावेळी स्टार्क आणि राणा या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवत चांगली साथ दिली. केकेआरच्या वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. वैभव अरोरानेही एक विकेट मिळवली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR