कोल्हापूर : प्रतिनिधी
विशाळगड अतिक्रमणविरोधी मोहिमेत झालेल्या तोडफोडीमुळे बाधित झालेल्या गजापूरपैकी मुसलमानवाडी (ता. शाहुवाडी) येथील नागरिकांना बुधवारी जिल्हा प्रशासनातर्फे प्रत्येकी ५० हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली.
जिल्हाधिकारी अमोल येडगे बुधवारी विशाळगडावरच होते. यावेळी ५६ कुटुंबांना हे अर्थसाहाय्य देण्यात आले. मोहरममुळे बुधवारी गडासह परिसरातील अतिक्रमणे काढली गेली नाहीत. मात्र, आज गुरुवारपासून उर्वरित सर्व बांधकामे उरतविण्यात येतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
रविवारी विशाळगड अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान समाजकंटकांनी दगडफेड, फोडाफोडी करून मुस्लिम कुटुंबीयांची घरे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. गजापूरपैकी मुसलमानवाडी येथील अंदाजे ४१ घरांची जमावाने नासधूस करून घरातील साहित्याचे मोठे नुकसान केले होते. या नुकसानीबाबत विस्तृत अहवाल पंचनामे करून शासनास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादर केला आहे.
वाडीमध्ये ५६ कुटुंबे राहतात. या कुटुंबांना शासनातर्फे तातडीची मदत म्हणून बुधवारी जिल्हाधिकारी येडगे यांच्या हस्ते जीवनावश्यक साहित्यासाठी २५ हजार रुपये आणि घरदुरुस्तीसाठी ४१ घरांना प्रत्येकी २५ हजार रुपये धनादेशाव्दारे देण्यात आले. नुकसानीचे घरनिहाय पंचनामे करून पुढील दोन दिवसांत ते शासनाला सादर केले जाणार आहेत.
आजपासून पुन्हा अतिक्रमण काढणार
सोमवार व मंगळवारी या दोन दिवसांत प्रशासनाच्या वतीने विशाळगड परिसरातील जवळपास १०० अतिक्रमणे काढण्यात आली. बुधवारी मोहरम असल्याने ही मोहीम थांबवली गेली. मात्र परिसरात आणखी १५ ते २० अतिक्रमणं काढायची बाकी आहेत. आज (गुरुवार)पासून पुढील दोन दिवसांत ही कारवाई पूर्ण केली जाईल.