23.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रगडचिरोलीत मतदानात घातपाताचा धोका?

गडचिरोलीत मतदानात घातपाताचा धोका?

राज्य सरकार अलर्ट

मुंबई : लोकसभा निवडणूक मोकळ्या वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदारसंघात खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस यंत्रणा वेगाने काम करीत आहे. विदर्भातील गडचिरोली मतदारसंघ हा नक्षलवाद्यांच्या रडारवर असतो, त्यामुळे या ठिकाणी यंत्रणा अधिक अलर्ट झाली आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा मतदारसंघांत निवडणुका होत आहेत. गडचिरोली-चिमूर मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात होत आहे. गडचिरोली हा विभाग माओवादीदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. या मतदारसंघातील ४२८ मतदान केंद्रे दुर्गम भागात आहेत. त्यामुळे पोलिसांचे या मतदारसंघात विशेष लक्ष आहे.

निवडणुकीच्या काळात गडचिरोली मतदारसंघात नक्षलवाद्यांकडून घातपात घडवून आणला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मतदानाच्या आधी व नंतर पाच दिवस हवाई रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मतदानाच्या दरम्यान माओवाद्यांकडून गडचिरोली मतदारसंघात घातपात होण्याची शक्यता आहे. ऐनवेळी घातपात झाल्यास संभाव्य जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रशासन यंत्रणेकडून पाहणी सुरू आहे.

मतदानाच्या आधी दोन दिवस व मतदानानंतर दोन दिवस हवाई रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हेलिकॉप्टर पुरवठा कंपनीच्या यादीतील कंपनीकडून हवाई रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. गृह विभागाने सोमवारी त्यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.
गडचिरोली हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या अतिशय विस्तीर्ण असून, हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या (एसटी) उमेदवारासाठी राखीव आहे. आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी असे तीन तसेच चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी, चिमूर व गोंदियातील आमगाव अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून गडचिरोली लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. चंद्रपूरमधून गडचिरोली विभक्त होऊन स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर २००९ मध्ये गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR