शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
जिल्ह्यातील वृक्ष लागवड मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत श्रावण सोमवारी वृक्षारोपण करून हे सण, उत्सव अनोख्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत गणेशवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत बेल वृक्ष लागवड करण्यात आली.
यासंगी गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण,सरपंच प्रतिनिधी नारायणपुरे, ग्रामसेविका एस.एस. स्वामीवस्त्रे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, बचत गटाच्या महिला, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी नागरिकांनी बेलाच्या रोपांची लागवड करावी. या माध्यमातून बेल वन साकारण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
त्यानुसार शिरूर अनंतपाळ तालुक्यातील गणेशवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महादेव मंदिर परिसरात ५१ बेल वृक्षांची तसेच १५ काशी बेल अशा एकूण ६५ बेल वृक्षांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण यांनी उपस्थित राहून वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग घेतला. तसेच तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावांतील मंदिर व परिसरात सुमारे २५० बेल वृक्षांची लागवड करण्यात आली असून श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून बेल वृक्षांची लागवड सुरु राहणार असल्याचे गटविकास अधिकारी बी. टी. चव्हाण यांनी सांगितले.