अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजराती उद्योजकांना उत्तर भारतात विशेषत: काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये बोलताना त्यांनी हे आवाहन केलें आहे. यावेळी या समिटमध्ये जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा देखील उपस्थित होते.
शहा म्हणाले, मला गुजराती उद्योजकांना सांगावसं वाटतयं की, त्यांना जर उत्तर भारतात आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यांनी काश्मीरमध्ये गुंतवणूक करावी. यासाठी त्यांनी काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराला पाठिंबा द्यावा.
यावेळी मनोज सिन्हा यांनी देखील गुंतवणूकदारांना शहांप्रमाणेच आवाहन केलं. त्यांनी म्हटलं की, उद्योजकांनी काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाला भेट द्यावी आणि तिथल्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हावं. आपण जम्मू आणि काश्मीरमध्ये गुंतवणुकीसाठी अनेक सामंजस्य करार केले आहेत. इम्मार ग्रुप इथं १० लाख स्केअर फीट भागात विकासाची काम करत आहे. युएईतील लुलू ग्रुपसोबत ही गुंतवणूक करण्यात आली असून यामध्ये दुमजली रिटेल मॉलची निर्मिती केल जाणार आहे.
शाह पुढे म्हणाले, व्हायब्रंट गुजरात हे मॉडेल देशातील अनेक राज्यांनी स्विकारलं आहे. भारत ही गुंतवणुकीसाठी जगासाठी सर्वात चांगली जागा आहे. त्यातही गुजरात ही सर्वात चांगली जागा आहे. गुजरात ही अशी जागा आहे जी २०४७ मधील विकसित भारतासाठीचा राजमार्ग आहे. त्यामुळं हे आपलं कर्तव्य आहे की यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे.