पुणे : प्रतिनिधी
श्रावण महिन्यात अनेक सण, उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतात. हीच बाब लक्षात घेता चार दिवसांपासून गुलाब, शेवंतीसह इतर फुलांना चांगलीच मागणी वाढली आहे.
त्यामुळे फूल उत्पादकांसह विक्रेत्यांना अच्छे दिन’ आल्याचे पाहायला मिळत आहेत. बाजारात सध्या वेगवेगळी सुगंधी फुलं दाखल झाली आहेत. श्रावण महिना सुरू होताच विविध सण, उत्सवास प्रारंभ झाला आहे.
सुरुवातीला फुलांचा बाजार थोडा गडगडला होता; परंतु आजमितीस सर्वच फुलांना बाजारात मागणी वाढली असून उत्पादकांसह विक्रेतेही आनंदी दिसत आहेत. आजतरी मंडईत फूल खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे. धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांसह इतर छोट्या-मोठ्या सणांना फुले घेऊन जाताना नागरिक दिसत आहेत.
शहरालगतचे फूलउत्पादक शेवंती, मोगरा, जास्वंद, गुलाब, केवडा, निशिगंध, डच गुलाब, झेंडू आदी फुले घेऊन शहरात दाखल होत आहेत. फुलांना मागणी वाढल्याचे लक्षात येताच विक्रेत्यांनी फुले खरेदी करणे सुरू केले असून शहरात अनेक ठिकाणी दुकाने थाटली गेली आहेत. तालुक्यातील शेतकरी आनंदी आहेत.