18.7 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूरगौरीच्या आगमनासाठी बाजार फुलला

गौरीच्या आगमनासाठी बाजार फुलला

लातूर : सिध्देश्वर दाताळ
आपल्या लाडक्या गणरायाबरोबरच गौरी महालक्ष्मीच्या आगमनास एक दिवस शिल्लक असताना गौरीचे मुखवटे व पूजेच्या साहित्याने लातूरची मुख्य बाजारपेठ सजली आहे. विक्रेत्यांनी असंख्य प्रकारच्या साहित्यांनी दुकाने सजवली आहेत. सोनपावलांनी गौरी घरोघरी येणार आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र एकच लगबग दिसून येत आहे.

श्रावण अमावास्या अर्थातच पोळा सण साजरा करुन श्रावणोत्सव संपला आणि भाद्रपदाच्या आगमनाने सर्वांना महालक्ष्मीच्या उत्सवाचे वेध लागले. अवघ्या एक दिवसांवर गौरी सण येऊन ठेपला आहे. या निमित्ताने बाजारपेठेत सर्वत्र जय्यत तयारीला सुरुवात झाली असून, गौरी स्वागतासाठी बाजारपेठ सजली आहे. सण-उत्सव काळात सर्वात जास्त महत्त्व असते ते सजावटीला. त्यामुळेच महालक्ष्मीचे मुखवटे यांच्या इतकीच मागणी सजावटीच्या साहित्यालाही दिसून येत आहे. महालक्ष्मीला लागणारे वेगवेगळे हार, मुकुट, पूजेचे आकर्षक सामान, वेगवेगळया प्रकारचे मखर, विविध प्रकारची तोरणे अशा विविध वस्तूंनी बाजारपेठ फुलून गेली आहे.

गौरीचा सण जवळ आला की महिलांची विविध वस्तूंच्या खरेदीसाठी लगबग सुरु होते. यंदा गौरीसाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. गौरीसाठी असलेल्या पत्र्याची कोथळ्याची जागा पुणेरी स्टॅण्डने घेतली असून गौरीला सजवण्यासाठी बाजारात खास कोल्हापुरी साज उपलब्ध झाले आहेत. तीन दिवस चालणा-या या गौरीच्या सणाला मोठे महत्त्व आहे. ज्यांच्या घरात नवीन सूनबाई आली आहे. ते कुटुंब गौरीसाठी लागणारे सर्व साहित्य पुन्हा नव्याने खरेदी करत असते. गौरीचे मुखवटे, गौरीचे दागिने, गौरी बसविण्यासाठीचा स्टॅण्ड या सर्व साहित्याची बाजारपेठेत जोरदार खरेदी सुरु आहे. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई, सुभास चौक या भागात गौरीसाठी अनेक दुकाने सजली आहेत. पूर्वी लोखंडी पत्र्यांच्या कोथळ्यावर साडी नेसवून गौरीची प्रतिष्ठापना केली जात असे. गेल्या काही वर्षापासून लोखंडी कोथळयांची जागा पुणेरी स्टॅण्डने घेतली आहे. ६०० ते ११०० रुपये किमतीला हे स्टॅण्ड बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

सोन्याच्या वाढत्या दरामुळे यंदा सोन्याचा मुलामा दिलेल्या कोल्हापुरी दागिन्यांना चांगली मागणी आहे. यात मंगळसूत्र १०० ते १५० रूपये, कंबरपट्टा ५० ते १२० रूपये, पुणेरी नथ ४० ते ८० रूपये, बाजुबंद १२० ते २०० रूपये, व्रजटीक ६० ते १५० रूपये, लक्ष्मीहार १५० ते ३०० रूपये, पोहेहार २०० ते ४०० रूपये, नवखाली हार ९० ते २०० रूपये, चंदेरी-सोनेरी मुकुट १२० ते २०० रूपये जाडी, महालक्ष्मीचे मुखवटे १००० ते ९००० रूपये, झेंडुच्या माळा १०० रूपयात ५ नग, लाईटिंग माळ १०० ते ४०० रूपये, झुबंर ३०० ते ३५० रूपये जाडी, चमकी माळा २० ते २५० रूपये, चदंन हार ८० रूपये जोडी, बोर माळ ७० रूपये जोडी, महालक्ष्मीचे पावले ३० रूपयात ६ नग, हिरवी केळी ५० ते ६० डजन, झुबंर ३०० ते १५०० रूपये, डेकोरेशन माळा ५० ते १०० रूपयात १२ नग, फळ लटकन १२० ते १५० रूपये, या दराने शहरातील बाजारपेठेत दाखल झाले आहेत. अशी माहीती होलसेल व्यापारी सुनिल पवार तसेच किरकोळ विक्रिते शेखर निराळे यांनी दिली आहे.

गौरीसाठीचे अनेक आकर्षक दागिनेही महिला वर्गाला खुणावत आहेत. मोत्यांचे, फुलांचे हार आणि या हारांना मध्यभागी मोठे पदक असे आपण नेहमीच पाहतो, पण यंदा मात्र हिरव्या पानांचे हार आणि पदकाच्या जागी आंबा, सफरचंद, संत्री या फळांचे पदक, चदंन हार, नवखाली हार, बाजुबंद, कंबरपट्टा, असे नावीन्यपूर्ण हार बाजारात आले आहेत. हे हार बाजारात ८० रुपयांपासून ते ६०० रुपयात उपलब्ध आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR