चाकूर : प्रतिनिधी
चाकूरच्या बसस्थानकाची दुरवस्था झाली असून परिसरात चोहोबाजूने घाणीचे साम्राज्य पसरल्याने दुर्गंधी पसरली असून प्रवाशांना नाकाला रुमाल लावून बसस्थानकात ये -जा करावी लागत आहे. मागील दहा वर्षांपासून कसल्याही प्रकारच्या सुविधा प्रवाशांना मिळत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात असून महामंडळाचे अधिका-याकडून बसस्थानकाची डागडूजी केली जाईल असे सांगितले जाते मात्र प्रत्येकी वेळी प्रवाशांना चकमा दाखवून वेळ काढूपणा केला जात आहे. चाकूर बसस्थानकाची निर्मिती ४३ वर्षापुर्वी झाली असून तेव्हा बांधलेल्या शौचालयाची दुरवस्था झाली आहे. त्याची दुरूस्तीही केली जात नाही. वाहनतळावर डांबरीकरण करण्याऐवजी खडक टाकून खड्डे बुजविले जात आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसामुळे बसस्थानक परिसरातील सर्व खडी उघडी पडल्यामुळे प्रवाशांच्या अंगावर चिखल उडत आहे. खड्ड्यात पाणी साठल्याने प्रवाशांना बसस्थानकात येताना-जाताना पाय घसरून पडत असून तारेवरची कसरत करावी लागत आहे.
परिसरात चोहीबाजूनी घाणीचे साम्राज्य पसरल्याने दुर्गंधी पसरली आहे. यामुळे प्रवाशांना नाकाला रुमाल लावून बसस्थानकात ये-जा करावी लागत आहे. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची व शौचालयाची व्यवस्था नसल्यानेही प्रवाशातून नाराजीचा सूर निघत आहे. शहरात व्यापारासाठी विविध राज्यातून बहुतांश प्रवाशांची ये-जा करतात. शहरामध्ये शैक्षणिक संस्था, केंद्रीय विद्यालय, सीमा सुरक्षा दलाचे प्रशिक्षण केंद्र, कृषी महाविद्यालय असल्यामुळे बाहेरून येणा-यां प्रवासी व विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक शाळकरी विद्यार्थींनी येथून प्रवास करतात. त्यांना स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यामुळे त्यांची कुचंबना होत आहे.
बसस्थानाकात सुविधा पुरविण्याबाबत प्रवाशांकडून वारंवार मागणी केल्यानंतर तत्काळ सुविधा उपलब्ध केल्या जातील असे आश्वासन दिले जाते परंतु प्रत्यक्षात कामाला सुरूवात होत नाही. संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे प्रवाशांना या बसस्थानकात भौतिक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. लोकप्रतिनीधी व अधिका-यांंनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर बसस्थानक परिसर स्वच्छ करण्यात यावा व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवासी व नागरिकांतून होत आहे.