22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसंपादकीय विशेषचिंता ‘रील’बळींची

चिंता ‘रील’बळींची

फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर किंवा एक्स या सर्वांना मागे टाकत इन्स्टाग्रामला आपल्याकडे प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. म्हणजे ‘इन्स्टा’वर अकाऊंट नसेलही अनेकांचे, पण इन्स्टाग्रामवरील रील्स पाहण्यामध्ये दिवसातला बहुमूल्य वेळ सहजगत्या वाया घालवणा-या तरुण-तरुणींची संख्या काही लाखांत असेल. यूट्यूबवरील रिल्सनाही प्रचंड प्रेक्षकवर्ग लाभत आहे. यातून रील्स मेकिंग ही करिअरवाटही बनली आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी नेहमीच काही तरी जबरदस्त किंवा हटके कंटेंट गरजेचा असतो. त्यामध्ये थ्रील असेल तर सोने पे सुहागा! पण या थ्रीलच्या मागे धावताना आपल्या जिवाचेही भान राहू नये इतके बेभानपण येत असेल तर ती नक्कीच चिंतेची बाब ठरते.

अलीकडेच उत्तर प्रदेशात हरिद्वारमध्ये एका वीस वर्षीय विद्यार्थिनीने रेल्वे रुळावर रील बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी आलेल्या ट्रेनची धडक बसून तिला आपला जीव गमवावा लागला. ज्या मुलीला शिक्षण घ्यायचं होतं, खेळायचं होतं आणि चांगल्या भविष्याची स्वप्नं पहायची होती, त्या मुलीच्या या स्वप्नांची रील बनवण्याच्या नादात राखरांगोळी झाली. इन्स्टाग्रामवर रिल्स बनवण्याचं सगळ्यांनाच वेड लागलं आहे. व्हीडीओ तयार करून सोशल मीडियावर झटक्यात स्टार होण्याचं फॅड सगळ्यांमध्येच दिसून येत आहे. मात्र, त्यासाठी तरुण वर्ग कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता कुठल्याही टोकाला जात आहेत. या रिल्स बनवण्याच्या नादात अनेकांना गंभीर दुखापत देखील झाली आहे. तसेच अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातल्या हडपसर भागात घडली होती. दोन तरुणांच्या रिल्स बनवण्याच्या नादात एका महिलेचा जीव गेला होता.

मध्यंतरी आत्महत्या या विषयावर रिल बनवणा-या एका तरुणाचा गच्चीवरून पाय घसरला आणि तो मरण पावल्याची घटना घडली होती. आधुनिक तंत्रज्ञान आपल्या राहणीमानात गुणात्मक सुधारणा घडवून आणते, परंतु त्याचा वापर बेलगाम आणि अनावश्यक रीतीने करण्यात मग्न राहणे हे वेळ वाया घालवण्याबरोबरच घातक ठरू शकते, ही बाब अशा उदाहरणांवरून स्पष्ट होते. हातात स्मार्टफोन आणि त्यात सामावलेले सोशल मीडियाचे जग हे खूपच सुंदर आणि रमणीय वाटू लागते. प्रसिद्धी मिळवण्याची चटक, ओळख निर्माण करण्यासाठी आणि लोकांची मान्यता मिळवण्यासाठी सोशल मीडियाने अनेक मार्ग दाखविले आहेत, अगदी फुकटात. कोणतीही मेहनत नसणारा मार्ग. पण त्याची किंमत चुकवावी लागते तेव्हा आपल्या हातून बरेच काही निघून गेल्याचे लक्षात येते.

सोशल मीडियावर रील्स आणि स्टोरी टाकण्याच्या वेडात मुंबईतील एक जोडपे समुद्रातच बुडाले होते. कर्नाटकातील २३ वर्षीय युवक रील्स तयार करण्याच्या प्रयत्नात धबधब्यात कधी वाहून गेला हे समजले देखील नाही. सुरतमध्ये रील्स तयार करताना एक मुलगा मालगाडीखाली आला. अशा कितीतरी भीतीदायक घटना सांगता येतील. कधी टिकटॉक, तर कधी इन्स्टाग्राम तर काही स्नॅपचॅट तर वाईबू किंवा फेसबुकवर पोस्ट करण्यासाठी तरुण-तरुणी, जोडपे सर्व मर्यादा पार करताना दिसत आहेत. सोशल मीडियाच्या प्रभावाचे आकलन एका आकडेवारीने करता येईल. भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे सक्रिय यूजर ५३ कोटी १४ लाखांपेक्षा अधिक आहेत. इन्स्टाग्रामचे ५१ कोटी ६९ लाख, फेसबुकचे ४९ कोटी २७ लाख, टेलिग्रामचे ३८ कोटी ४० लाख आणि फेसबुक मेसेंजरचे ३४ लाख ३९ लाख यूजर आहेत. आता तर थ्रेड्स नावाचा नवीन प्लॅटफॉर्मही आला आहे. भविष्यातही येत राहतील आणि कोट्यवधी लोक त्यात सामील होतील. जगाचा विचार केला तर २०१७ मध्ये २.७३ अब्ज नागरिक सोशल मीडियाचा वापर करत होते तर २०२४ मध्ये हा आकडा ४.८९ अब्जांवर पोचला आहे. २०२७ पर्यंत हा आकडा ५.८५ अब्जावर पोचेल. हे आकडे धक्कादायक आहेत.

संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये जगाची एकूण लोकसंख्या ८ अब्जापेक्षा अधिक होती तर त्यात निम्म्याहून अधिक नागरिक हे सोशल मीडियावर सक्रिय होते. सोशल मीडियाचा अर्थ आपण चुकीने लावला आहे की काय असे वाटू लागले आहे. समाजाच्या नियमांचे, रीतीरिवाजांचे पालन करणे, एकत्र राहणे, सर्वांशी मिळूनमिसळून राहणे म्हणजे सोशल होय आणि मीडिया म्हणजे माध्यम होय. पण हा सोशल मीडिया एकत्र आणण्याऐवजी लोकांत अंतर वाढविण्याचे काम करत आहे. सेल्फी आणि आता रील्सचा राक्षस तर आक्राळविक्राळ रूप धारण करत आहे. विवाहस्थळी, वाढदिवसाच्या ठिकाणी किंवा कोणत्याही कार्यक्रमात रील्सचे पॉईंट तयार केले जात आहेत. लोक एकमेकांचे सेल्फी, रील स्टेट्स, स्टोरी पाहत आहेत, लाईक करत आहेत अणि विसरून जात आहेत. कोणतीही स्टोरी, रील किंवा स्टेटस कायम नसते. काल कोणते स्टेट्स ठेवले, हे देखील लक्षात नसते. तरीही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतूनच मुले विकण्याची वेळ आली आहे. सोशल जगात सर्वकाही अनलिमिटेड आहे. फक्त लाइक्स हवे आहेत. मग प्रसंगी जिवाची बाजी देखील लावली जाते. हातात स्मार्टफोन आहे. त्यात अनेक सोशल अ‍ॅप आहेत. सर्वांना अपडेट टाकायची आहे, जेणेकरून आपण मागे राहू नये, लाइक्स कमी होऊ नयेत.

प्रश्न गंभीर आहे. एवढ्या मोठ्या सोशल मीडिया युनिव्हर्समुळे आयुष्य सुकर झाले आहे का? जग सुंदर झाले आहे का? आयुष्यातील अडचणी कमी झाल्या आहेत का? याचे उत्तर घरात, घराबाहेर आहे. त्याचे उत्तर रील्स, स्टेट्स, स्टोरीतून मिळतील का? त्याचे प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे झाल्यास कधीच नाही. कारण हा सर्व खटाटोप अंधारात तीर मारण्यासारखा आहे. सोशल मीडियाची सुरुवात १९९० च्या काळात झाली. त्यात जियोसिटीज, क्लासमेट्स डॉट कॉम आणि सिक्स डिग्रिज डॉट कॉमसारख्या व्यासपीठाच्या माध्यमातून सोशल मीडियाचा मानवाच्या आयुष्यात प्रवेश झाला. सिक्स डिग्रीज हा अद्वितीय प्लॅटफॉर्म होता. कारण ती वास्तवातल्या लोकांसाठी त्यांच्या वास्तवातल्या नावाचा उपयोग करून सर्वांना जोडली जाणारी पहिली ऑनलाईन सेवा होती.

यात प्रोफाईल, मित्रांची यादी, शाळा यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश होता. ‘सीबीएस न्यूज’च्या मते, ती पहिली सोशल नेटवर्किंग साईट म्हणून नावारूपास आली. २००० च्या दशकाच्या प्रारंभी फ्रेंडस्टर आणि मायस्पेससारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने व्यापक लोकप्रियता मिळवली. त्यानंतर फेसबुक, यूट्यूब, ट्विटरसह अन्य प्लॅटफॉर्म आले. पण या व्यासपीठावरून मानवी भावनांचा अंत होताना पाहत आहोत. वास्तविक जगाच्या ठिकाणी आभासी जगाचा विस्तार पाहत आहोत. जगाकडे नैतिक आणि मौलिक पतनाच्या दृष्टीने पाहत आहोत. समाजाला बाजार आणि माणसांना प्रॉडक्टचे रूप दिले जात आहे. ही सर्व परिस्थिती कशी बदलणार? माणसाचा हरवत चाललेला विवेक पुन्हा पूर्ववत कधी होणार?

-शुभांगी कुलकर्णी,
समाजशास्त्राच्या अभ्यासक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR