मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील चेंबूर परिसरात आज सकाळी एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्फोटानंतर आग लागली, या घटनेत किमान १० जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना चेंबूरच्या सीजी गिडवाणी मार्गावरील एका घरात घडली.
समोर आलेल्या माहितीनुसार सकाळी साडेसातच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घटनास्थळी आग लागली. त्यामुळे घराचेही नुकसान झाले. यात १० जण जखमी झाले आहेत. स्फोट आणि आगीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना गोवंडी येथील शासकीय शताब्दी रुग्णालयात दाखल केले. या घटनेतील जखमींमध्ये २ अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे.
अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या घटनेत १० जण जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये ओम लिंबाजीया (वय ९), अजय लिंबाजिया (वय ३३), पूनम लिंबाजीया (वय ३३), सुदाम शिरसाट (५५) यांचा समावेश आहे. यातील सुदाम शिरसाट यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली असून त्यांना सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याचा तपास अधिकारी करत आहेत.