नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीतील महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत आज माहिती दिली. यावेळी त्यांनी चेक बाबत महत्त्वाची माहिती दिली. आता चेक क्लिअरन्स काही तासांमध्ये होणार आहे.
चेक क्लिअरिंगसाठी लागणारा वेळ काही तासांपर्यंत कमी करण्यासाठी आणि संबंधित जोखीम कमी करण्यासाठी पावलं उचलण्याची घोषणा रिझर्व्ह बँकेनं केली. सध्या चेक जमा होण्यापासून रक्कम येईपर्यंत दोन दिवसांचा कालावधी लागतो. पण नव्या प्रणालीत चेक जमा केल्यानंतर काही तासांतच तो ‘क्लिअर’ केला जाणार आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी चालू आर्थिक वर्षाचा तिसरा पतधोरण आढावा जाहीर केला. चेक क्लिअरिंग सुरळीत करण्यासाठी, सेटलमेंट जोखीम कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना चांगल्या सेवा देण्यासाठी चेक ट्रंकेशन सिस्टमच्या (सीटीएस) विद्यमान कार्यपद्धतीत बदल प्रस्तावित आहेत. सध्याच्या सीटीएस व्यवस्थेत बॅचमध्ये प्रक्रिया करण्याऐवजी कामकाजाच्या वेळेत सातत्यानं क्लिअरिंग केलं जाईल, असे दास म्हणाले.
अशी असेल नवी व्यवस्था…
नव्या प्रणालीनुसार चेक स्कॅन करून ते प्रेझेंट केले जातील आणि काही तासांत क्लिअर केले जातील. यामुळे सध्याच्या दोन दिवसांच्या (टी+१) तुलनेत काही तासांत चेक क्लिअरिंग होईल. यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक तत्त्वं लवकरच जारी केली जातील, असे दास यांनी सांगितले. याशिवाय बँकांनी दर पंधरवड्याला आपल्या ग्राहकांची माहिती क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना द्यावी, असा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने ठेवला आहे. सध्या हा अहवाल महिन्यातून एकदा दिला जातो.