लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदारसंघ अनेक दिवस चर्चेचा राहिला. अगदी उमेदवारीपासून अनेक तर्क-वितर्क लावले गेले. त्यास मतदारांनी बाजूला सारून काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना निवडून आणले. त्याबद्दल राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. ५ जून रोजी येथील काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत जनता जनार्दनाचे लाख लाख आभार मानले.
लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेद वार डॉ. शिवाजी काळगे ६१ हजार ८८१ एवढे मताधिक्य घेऊन निवडून आले. त्यानिमित्त लातूर जिल्हा व लातूर शहर जिल्हा काँग्रसेच्या वतीने बुधवारी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते. या पत्रकार परिषदेस लातूरचे नवनिर्वाचीत खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, काँग्रेसचे निरीक्षक अमर जाधव, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, माजी आमदार रोहिदास पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे एकनाथ पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, कॉंग्रेसचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, आशाताई शिंदे, अॅड. उदय गवारे, सुनील बसपूरे, अभय साळूंके यांची उपस्थिती होती.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात काँग्रेस महाविकास आघाडीने गरुड झेप घेतली. काँग्रेस महाविकास आघाडीला मतदारांनी भरभरुन आर्शिवाद दिले. विशेषत: मराठवाड्यात काँग्रेस महाविकास आघाडीला लक्षवेधी यश मिळाले. आठ पैकी सात जागा जिंकुन नवा इतिहास निर्माण केला, असे नमुद करुन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, भारताचे संविधान अडचणीत आल्याची चर्चा होती. मतदारांनी संविधान वाचविण्याच्या बाजूने कौल दिला. काँग्रेस महाविकास आघाडीचे नेते मल्लिकार्जून खर्गे, काँग्रेसचे महासचिव रमेश चेन्निथला, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंडिया महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले. राज्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खुप कष्ट केले. महाविकास आघाडीचा विचार घराघरापर्यंत पोचवला. बुथ प्रमुख, बुथ समितीपासून ते महाविकास आघाडीचा कार्यकर्ता कौतूकास पात्र आहे. लातूर लोकसभा मतदारसंघातील लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, उदगीर, अहमदपूर, लोहा-कंधार या सहाही विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद.
मार्गदर्शक म्हणुन आणि आम्हा सर्वांचे नेतृत्व ज्यांनी केले ते राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे विशेष आभार. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे, कार्यामुळे महाविकास आघाडीला यश मिळण्यात फार अडचणी आल्या नाहीत. सर्कल प्रमुख, बुथ प्रमुख, पक्षाचे निरिक्षक अॅड. दीपक सुळ, अॅड. किरण जाधव, संतोष देशमुख, विक्रांत गोजमगुंडे, रविंद्र काळे, सर्जेराव मोरे, अनुप शेळके, पंडागळे, पवार, शामसुंदर शिंदे व त्यांच्या सर्व सहकार्याचे अभिनंद आणि कौतुक करावे तितके कमी आहे. डॉ. शिवाजी काळगे यांचे खास आभार. ते राजकीय क्षेत्रातील नाहीत. ते वैद्यकीय क्षेत्रातील आहेत. सद्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन आणि आमच्या सर्वांच्या अग्रहाचा त्यांनी आदर केला व लातूर लोकसभेची निवडणुक लढली. काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी यांचाही सहवास लाभला. त्यांची भेट, त्यांचा स्पर्श बळ देणारा होता. काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांची उदगीर येथे ऐतिहासीक सभा झाली. बाळासाहेब थोरात, नानाभाऊ पटोले, विजय वड्डेटीवार, चंद्रकांत हांडोरे, सुषमा अंधारे, उल्हास पवार, सचिन साठे, यशपाल भिंगे, ओमराजे निंबाळकर, विनायकराव पाटील, शोभा बेंजरगे, डॉ. अरविंद भातांब्रे, हमीद शेख, कल्याण पाटील, मन्मथप्पा किडे, मंजूरखॉ पठाण, लातूर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातून चांगले काम, चांगले समर्थन मिळाले त्याबद्दल सर्वांचे आभार.
नांदेडमध्ये वसंत ऋतू बहरला, असे नमुद करुन माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, जालन्यातून कल्याण काळे, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, बीडमधून बजरंग सोनवणे, परभणीतून संजय जाधव, हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर यांनी मिळविलेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन. यावेळी बोलताना लातूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी जनतेचे आभार मानले. तसेच माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकुरकर, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख, काँगे्रस महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर्स यांचेही आभार मानले. जनसामान्यांना विश्वास सार्थ ठरवणार, असल्याचे नमुद करुन जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवून, असा शब्द त्यांनी दिला.