श्रीनगर : कलम ३७० हटवल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी आज जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच सुरेंद्र चौधरी यांनी जम्मू-काश्मीरच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये उमर आणि त्यांच्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला प्रथमच केंद्रशासित प्रदेशाचे तर दुस-यांदा जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री बनले आहेत. यावेळी इंडिया आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, राष्ट्रवादीच्या शरद गटाच्या सुप्रिया सुळे, पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती, सीपीआयचे डी. राजा आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली.
शपथ घेण्यापूर्वी ओमर अब्दुल्ला यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे संस्थापक शेख मुहम्मद अब्दुल्ला यांना श्रद्धांजली वाहिली. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची युती होती. एनसीने विधानसभा निवडणुकीत ४२ जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला ६ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसने एनसी सोबत युती केली असली तरी सरकारमध्ये सामिल होण्यास नकार दिला आहे.
या आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
१. जावेद अहमद डार
२. सतीश शर्मा
३. सकीना इट्टु
४. जावेद राणा
५. सुरिंदर चौधरी
काँग्रेस अध्यक्षांनी दिल्या शुभेच्छा
ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये आमच्या मित्रपक्षाचा मुख्यमंत्री झाला आहे. याचा आम्हाला आनंद आहे. प्रदीर्घ काळानंतर येथे लोकशाही प्रस्थापित झाली आहे. येथे राज्यत्व पुनर्संचयित होईल याची आम्ही खात्री करू, असेही खरगे म्हणाले.