16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरजरांगे करणार सामूहिक उपोषण

जरांगे करणार सामूहिक उपोषण

अंतरवालीत केली घोषणा, नव्या सरकारची वाढू शकते डोकेदुखी?

जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले असून, आज त्यांनी पुन्हा आंदोलनाचे संकेत देत आपण आता सामूहिक उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. मी माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी पुन्हा लढा उभारणार आहे, असे म्हटले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा नव्या सरकारची डोकेदुखी वाढवू शकतात, अशी शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे नव्याने निवडून आलेल्या आमदारांवर या मुद्यावरून ते दबाव वाढविण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारकडून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मंजूर करण्यात आले. मात्र, आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे, या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. आपण निवडणुकीत उमेदवार देणार आहोत, असे त्यांनी म्हटले होते. तसेच जिथे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, तिथेच उमेदवार देणार आणि जिथे शक्यता नाही, तिथे मराठा आरक्षणाला पाठिंबा देणा-या उमेदवारांच्या पाठिशी उभे राहा, अशी भूमिकाही स्पष्ट केली होती.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी मराठा, मुस्लिम आणि दलित समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यानंतर ऐनवेळी मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची पुढची रणनीती काय असणार, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. आता त्यांची रणनीती हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जुना डाव खेळला असून, आता त्यांनी नव्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR