जळकोट : प्रतिनिधी
जळकोट मध्ये एका तरुणाने समाज माध्यमावरून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला होता. या विरोधात जळकोटमध्ये प्रचंड असे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते . दि १९ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ४०० ते ५०० लोकांचा जनसमुदाय पोलीस ठाण्यात पोहोचला व धार्मिक भावना दुखावणा-या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी केल्यानंतर आरोपीविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळकोट येथे गत पंधरा दिवसांपासून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे प्रकार समाज माध्यमाद्वारे पसरविले जात आहेत. यामुळे शहरांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थीतीत पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जळकोट पोलिसांनी शहरात मोठा फौज फाटा आणत दि२० सप्टेंबर रोजी शक्ती प्रदर्शन करीत शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. याद्वारे पोलिसांनी जो कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा सूचक इशारा यावेळी दिला आहे. संपूर्ण जळकोट शहरांमध्ये पोलिसांनी मोठा मार्च काढला. या तणावाचाा पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात २० सप्टेंबर रोजी शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मन्मथ किडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, तहसीलदार राजेश लांडगे, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, नगरसेवक तात्या पाटील, पत्रकार राजेंद्र धुळशेट्टे, मोमिन एम . जी , मैनोद्दीन लाटवाले , यांच्यासह जळकोट शहरातील अनेक नगरसेवक तसेच नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी मनीष कल्याणकर यांनी जळकोट मध्ये एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावतील असे व्यक्तव्यकिंवा लिखाण समाज माध्यमावर करू नये , तसेच जळकोटमध्ये समाजात समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही . याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पोलीस आपले काम करेल परंतु जो कोणी समाज माध्यमावरून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करेल तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वागेल त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल . असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष किडे यांनीही शहरांमध्ये दोन समाजामध्ये दीड निर्माण होईल असा प्रकार घडू नये असे आवाहन केले आहे. याप्रसंगी लक्ष्मण नागरगोजे, राहूल वडारे, राठोड , यांच्यासह पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस उपस्थित होते.