22.8 C
Latur
Thursday, February 22, 2024
Homeलातूरजाता येईना माळेगावला तर या जळकोटला

जाता येईना माळेगावला तर या जळकोटला

जळकोट : ओमकार सोनटक्के

येथे दरवर्षी श्री दत्त जयंती यात्रा महोत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते. पंचक्रोशीत जळकोटची यात्रा प्रसिद्ध आहे. यावर्षीही जळकोटची दत्त जयंती यात्रा गजबजणार आहे. जळकोट मध्ये दत्त जयंती यात्रेमध्ये आता गतवैभव प्राप्त झाले आहे. मधल्या काळात यात्रेला उतरती कळा लागली होती मात्र गत पाच ते सहा वर्षापासून जळकोट मध्ये दत्त जयंती यात्रा मोठ्या प्रमाणात भरत आहे. जळकोट येथे प्रसिद्ध असे श्री दत्ताचे मंदिर आहे. दर वर्षी श्री दत्त जयंतीनिमित्त जळकोट येथील दत्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. कै. दिगंबरराव गबाळे यांच्या संकल्पनेतून या मंदिराची स्थापना करण्यात आली होती.

पंचक्रोशीत श्री दत्ताचे एकमेव असे मंदिर असल्यामुळे भाविकांची दर्शनासाठी या ठिकाणी मोठी गर्दी होते. जळकोट येथील दत्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमा सोबतच मोठी यात्रा देखील भरते. या यात्रेनिमित्त दरवर्षी पशुप्रदर्शन, कृषी प्रदर्शन, कुस्त्यांचा फड, विविध सामाजिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक कार्यक्रम होत असतात यामुळे या यात्रेला एक आगळेवेगळे महत्त्व आहे.

दत्तजयंती यात्रेच्या पार्श्वभूमीवर जळकोटमध्ये बच्चेकंपनीसाठी मोठ्या प्रमाणात मेरी गो राऊंड, गगनचुंबी आकाशी पाळणे देखील जळकोटमध्ये दाखल झाली आहेत. सध्या आकाशी पाळणे उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून काही दिवसात आकाशी पाळण्यात बसून यात्रेचा आनंद लुटता येणार आहे. यासोबतच जंमपिंग जपांग, ब्रेक डान्स, मिकि माऊस, सलाम गो अशी बच्चे कंपनीसाठी मोज मजेचे साधने यात्रेत आलेली आहेत. तसेच विविध दुकाने देखील जळकोट येथील दत्त मंदिर परिसरामध्ये थाटली आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी विविध साहित्य खेळणी खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

यामुळे तालुक्यातील जनतेला चांगल्या खरेदीची संधी मिळणार आहे. माळेगावची यात्रा जळकोटची यात्रा झाल्यानंतर पंधरा दिवसांनी भरते. माळेगाव यात्रेमध्ये जाणारे जे आकाशी पाळणे आहेत तीच व इतर मनोरंजनात्मक साधने जळकोट मध्ये येत असतात. यामुळे ज्यांना माळेगाव जाणे शक्य होत नाही असे नागरिक जळकोट येथे येऊन विविध मनोरंजनात्मक बाबीचा आनंद लुटत असतात. जळकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये ही यात्रा भरत असते आता याची व्याप्ती वाढली असून महात्मा बसवेश्वर चौकामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरत आहे. . या ठिकाणी देखील आकाशी पाळणे तसेच इतर मनोरंजनात्मक साधने दाखल झाली आहेत.

जवळपास दहा दिवस जळकोट तालुक्यातील बच्चेकंपनीला या यात्रेचा आनंद लुटता येणार आहे. जळकोट मध्ये यात्रा चांगल्या प्रकारे भरावी यासाठी नगरपंचायतीचे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे तसेच जळकोट मधील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत आहे .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR