17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरजिल्ह्यातील २२५८ ग्राहकांचा वीजपुरवठा पुन:र्जिवित

जिल्ह्यातील २२५८ ग्राहकांचा वीजपुरवठा पुन:र्जिवित

लातूर : प्रतिनिधी
महावितरणने वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या थकीत वीज बिल ग्राहकांसाठी अभय योजना सप्टेंबर पासून जाहीर केली होती. या योजनेत थकबाकी भरून सहभागी होत जिल्हयातील २ हजार २५८ वीजग्राहकांना पुन:र्जोडणी देण्यात आली आहे. आता या योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ चार दिवसांचा अवधी शिल्लक राहीला आहे. थकबाकी वरील व्याज आणि विलंब आकारात सूट मिळत असल्याने अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. ३० नोव्हेंबर पर्यंतच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जिल्­हयातील लातूर विभागातील ५७२ वीजग्राहकांनी सहभागी होत लाभ घेतला आहे तर उदगीर विभागातील ७६८ वीजग्राहकांनी सहभाग नोंदवला आहे. अभय योजनेला सर्वाधिक पसंती निलंगा विभागात मिळाली असून ९१८ वीजग्राहकांनी लाभ घेत पुन:र्जोडणी करून घेतली आहे. तथापि, कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत झालेल्या वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकित बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरुपातील दंड माफ करण्यात येणार आहे.
वीजबिलाचा वाद न्याय प्रविष्ट असलेल्या पीडी ग्राहकांनाही या योजनेचा काही अटी व शर्तीवर लाभ घेता येईल. मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून ऊर्वरित ७० टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळेल. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल. उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR