32.8 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeलातूरजि. प. मध्ये बदल्यासाठी हालचाली वाढल्या

जि. प. मध्ये बदल्यासाठी हालचाली वाढल्या

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचा-यांच्या नियमित बदल्यांसाठी वास्तव्य सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात आली आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा संपल्याने निवडणुकीची आचार संहिता शिथिल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रशासकीय व विनंती बदल्यांसाठी लातूर जिल्हा परिषदेत हालचाली वाढलेल्या दिसून येत आहेत.
लातूर जिल्हा परिषदेतील सर्व विभागाकडील संबधीत संवर्गाच्या बदल्याबाबत वास्तव्य सेवा जेष्ठता यादी अद्यावत करण्यात आली आहे. बदलीपात्र एकही कर्मचारी वास्तव्य सेवा जेष्ठता यादीमधून वगळला जाणार नाही याची काळजी घेतली जात आहे. जिल्हा परिषदेतील कर्मचा-यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यामुळे सेवा जेष्ठतेला महत्व असणार आहे. प्रशासकीय बदल्यासाठी १० वर्षाचा कालावधी तर विनंती बदल्यासाठी ३ वर्षाचा कालावधी ग्रा  धरला जातो. त्यानुसार बदली प्रक्रीया धोरण राबवले जाणार आहे.
चालक, शिपाई एकाच ठिकाणी ठाण मांडून
लातूर जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील ३५ संवर्गातील गट-क व गट-ड कर्मचा-यांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात आली आहे. जिल्हा परिषद मुख्यालयातील विभाग प्रमुखांच्या दालनात शिपाई, प्रमुखांच्याकडे चालक गेल्या १० ते १५ वर्षापासून ठाण मांडून आहेत. त्यामुळे इतर जिल्हयाबाहेर काम करणा-या कर्मचा-यांना ही जि. प. मुख्यालयात काम करण्याची संधी मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. सीईओ, बांधकाम विभागातील शिपाई अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. तसेच दिव्यांग, दुर्धर आजार आदी सवलतीचा लाभ घेणारेही कर्मचारी अनेक वर्षापासून मुख्यालयातच या-ना त्या कार्यालयात कार्यरत असल्याने इतरांना संधी मिळणार कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामसेवकांच्याकडून जोरदार फिल्डींग सुरू 
लातूर जिल्हयात कार्यरत असलेले ग्रासेवक लातूर, रेणापूर, औसा या ठिकाणी येण्यासाठी जोरदार फिल्डींग लावत आहेत. लातूर, औसा १०० टक्के पदे भरलेली आहेत. तर अहमदपूर, जळकोटला जागा रिक्त असूनही तेथे जाण्यासाठी ग्रामसेवकांचा फारसा उत्साह दिसून येत नाही. त्यामुळे इतर तालुक्यात जागा उपलब्ध असल्यातरी लातूर, औसा, रेणापूर येथे संभाव्य जागा रिक्त होतात का याची ग्रामसेवक चाचपणी करताना दिसून येत आहेत. मात्र त्यासाठी राज्यात आचार संहिता शिथिली होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR