पावसाळा सुरू झाला की, सृष्टीचे रुपडेच पालटते. शेतक-यांनी धरणी मातेची ओटी भरल्याने शेतशिवार हिरवाईने फुलून जाते. ओढे, नाले, नद्या जीवनरसाने ओथंबून जातात. डोंगरमाथ्यावरून फेसाळणारे पाणी अल्लड-खट्याळ बालकासारखे बागडत असते. ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’ सर्वत्र पसरलेले दिसतात. सृष्टीचे हे सौंदर्य माणसाला खुणावत असते, बोलवत असते. ‘केल्याने पर्यटन शहाणपण येते’ असे म्हणतात. निसर्गाची नवलाई अनुभवण्यासाठी माणूस सहलीचे आयोजन करतो.
वर्षा सहलीचा प्लॅन आखला जातो आणि ब-याच वेळा इथेच माशी शिंकते! शनिवार-रविवारसह दोन सुट्या टाकून तरुणाई निसर्ग सौंदर्य लुटण्यासाठी घराबाहेर पडते. सृष्टीसौंदर्य डोळ्यात साठवत असताना पर्यटकांना उत्साहाचे भान रहात नाही आणि अप्रिय, दु:खदायक घटना घडतात. अशीच एक दुर्घटना नुकतीच लोणावळ्यात घडली. वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या अन्सारी कुटुंबातील पाच जण धरणाच्या पाठीमागे असलेल्या धबधब्यातून वाहून गेले. त्यात ४ लहान मुले आणि एका महिलेचा समावेश होता. पुण्यातील हडपसर येथे राहणारे अन्सारी कुटुंब पर्यटनासाठी लोणावळ्यात आले होते. लोणावळा परिसरात रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित होऊन धरणात येत होते. धबधब्याच्या पाण्यात १५ ते १७ जण वर्षाविहाराचा आनंद घेत असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास ४ लहान मुले पाण्यात वाहून जाऊ लागली. त्यांना वाचवण्यासाठी गेलेली महिलादेखील धरणाच्या जलाशयात वाहून गेली. पाण्याचा अंदाज न आल्याने अन्सारी कुटुंब उद्ध्वस्त झाले. या पाठोपाठ ताम्हिणी घाटातही एक दुर्घटना घडली.
येथील नदीत एका तरुणाने रील बनवण्यासाठी उडी मारली. त्यात तो तरुण वाहून गेला. पर्यटनस्थळी आपत्कालीन व्यवस्था कार्यरत असली तरी निसर्गाचा प्रकोप केव्हा, कसा होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे उगाच आनंदाच्या भरात पर्यटकांनी अतिउत्साहीपणा न दाखवता पर्यटनस्थळी संयम बाळगून वर्षा सहलीचा आनंद उपभोगण्यात शहाणपण आहे. पावसाळी पर्यटन करताना सावधानता बाळगायलाच हवी. पर्यटकांनी आपल्या जीवाची तर काळजी घ्यावीच पण इतरांनाही सावध करायला हवे. भुशी धरण परिसरातील दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आता सर्व जिल्हाधिकारी जिल्ह्यातील धोकादायक पर्यटन स्थळांचा आढावा घेणार आहेत. पावसाळी पर्यटन सुरक्षित होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व धोकादायक स्थळांवर सूचना फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जीवन रक्षक तैनात करा, रुग्णवाहिका तयार ठेवा, एसडीआरएफची टीम तयार ठेवा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. माणूस हा मुळात निसर्गप्रेमी आहे.
त्याला डोंगर-द-या, वनराई, प्राणी यांचे आकर्षण असते. उंच उंच डोंगर त्याला खुणावत असतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून तो ट्रेकिंग, पावसाळी सहलीवर निघतो. परंतु अनेकवेळा अनोळखी ठिकाणी त्याला धोक्याचे भान रहात नाही. त्याची किंमत मृत्यूच्या रूपात मोजावी लागते. ताणतणावाच्या जीवनशैलीत आनंद शोधण्यासाठी आपण आपला जीव धोक्यात घालत आहोत हे त्याच्या लक्षातच येत नाही. वर्षा सहलीसाठी आलेले पर्यटक शिस्तीचे पालन करत नाहीत आणि नको ते धाडस करण्याच्या प्रयत्नात स्वत:चा जीव गमावतात. पोहायला येत नाही हे माहीत असूनही बेधडकपणे उडी मारली की दुर्घटना ही घडणारच. त्यामुळे युवावर्गाने काही गोष्टींची खबरदारी घ्यायलाच हवी. कुठेही गेल्यावर सेल्फीच्या फंदात पडणे, रील बनवणे, फेसबुक लाईव्ह करणे हे प्रकार टाळायला हवेत. पावसाळ्यात रस्ते निसरडे बनतात. त्यातील खाच-खळग्यांचा, खड्ड्यांचा अंदाज येत नाही. तेथे दुचाकीवर स्टंटगिरी केल्यास जीव जाणारच. नदी, तलाव, धरणे, समुद्र, धबधबे अशा ठिकाणी गेल्यावर तर विशेष सावधगिरी बाळगायला हवी. दरवर्षी पावसाळी पर्यटनात जीव गमावणा-यांची संख्या काही कमी नाही.
त्यामुळे पावसाळी पर्यटन करताना सावधानता बाळगायला हवी. अशा ठिकाणी प्रशासनाने सुद्धा सतर्क राहायला हवे. पर्यटनस्थळांच्या व्यवस्थापनाने या बाबतीत काळजी घ्यायला हवी. सावधानतेच्या सूचना ठळकपणे द्यायला हव्यात. पाण्याची पातळी किती आहे आणि कोणत्या मर्यादेच्या पुढे जाणे धोकादायक आहे याबाबतही सूचित करायला हवे. पर्यटकांनी गड, किल्ले, डोंगरावर भटकताना भान ठेवायला हवे. काही महाभाग अशा ठिकाणी मद्यपान करून जातात मग तोल हा सुटणारच! पर्यटकांनी स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घेतली पाहिजे. निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटायला काहीच हरकत नाही पण ही मजा लुटताना जीवावर बेतणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी. मौजमजा ही करायलाच हवी पण ती जीव धोक्यात घालून नव्हे. अनेक ठिकाणी धोक्याचे फलक लावलेले असतात, सुरक्षा रक्षकही असतात मात्र त्यांची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. पर्यटकांनी याची गांभीर्याने दखल घेतल्यास पर्यटनस्थळे आणि पर्यटन जीवघेणे ठरणार नाही.