मुंबई : ऑगस्टमध्ये प्रदर्शित झालेला ‘स्त्री २’ हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. त्याचबरोबर आणखी अनेक मोठे चित्रपट सप्टेंबरमध्ये थिएटरमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहेत, त्यातील एक म्हणजे ‘देवरा’. साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर अभिनीत हा चित्रपट काही दिवसांत प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चित्रपटातून ज्युनियर एनटीआरचा नवा लूक समोर आला आहे. कोराटल्ला शिवा दिग्दर्शित देवरा पार्ट-१ मध्ये ज्युनियर एनटीआर दमदार अॅक्शन करताना दिसणार आहे. याची झलक रिलीज केलेल्या नव्या पोस्टरमध्ये पाहायला मिळते.
या साऊथ सुपरस्टार अभिनेत्याच्या नव्या लूकमध्ये तो एका खडकावर उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. काळे पारंपरिक कपडे परिधान केलेल्या ज्युनियर एनटीआरचा हा लूक, डोळ्यात काजळ आणि चेह-यावर रागाचे भाव पाहून असे वाटते की हे एखाद्या अॅक्शन सीनचे पोस्टर आहे. त्याच्या हातात कु-हाडही आहे. यासोबतच या चित्रपटाचे ट्रेलर १० सप्टेंबर रोजी रिलीज करण्यात येणार असून, ‘देवरा’ चित्रपट २७ सप्टेंबर रोजी पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित होत आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘दाऊदी’ हे गाणे रिलीज झाले होते.