भाजपमध्ये जाणार?, हेमंत सोरेन सरकारला धक्का
रांची : वृत्तसंस्था
झारखंडचे माजी मुख्यमंत्री तथा झामुमोचे नेते चंपई सोरेन हे पक्षावर नाराज असून, मला मुख्यमंत्री पदावरून हटवून माझा अपमान केला, असा आरोप त्यांनी केला असून, आता हेमंत सोरेन सरकारविरोधात उघडपणे बंड पुकारले आहे. त्यामुळे झारखंडमधील सोरेन सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. आता चंपई सोरेन भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात असून, ते काही आमदारांना सोबत घेऊन दिल्ली गाठल्याचेही समजते.
झारखंडमध्ये याच वर्षात निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी झारखंडमधील सोरेन सरकारला सुरुंग लावण्याचे काम भाजप करीत असल्याची चर्चा होती. त्यामुळे आता झारखंडमध्येही महाराष्ट्रासारखे फोडाफोडीच्या राजकारणाला उत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाली, तेव्हा काही तास आधी हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी चंपई सोरेन यांच्या हाती सोपवण्यात आली होती. मात्र, हेमंत सोरेन हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ३ जुलै रोजी चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि हेमंत सोरेन मुख्यमंत्री झाले. त्यावेळीपासून चंपई सोरेन नाराज असल्याचे बोलले जात होते. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यांनी समर्थक आमदारांसह दिल्ली गाठून भाजप नेत्यांची भेट घेतल्याचेही समजते.
जेएमएममधील सूत्रांनी सांगितले की, झारखंडच्या आगामी विधानसभा निवडणुकीत चंपई सोरेन यांनी घाटशीला मतदारसंघातून त्यांच्या मुलासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांची विनंती नाकारल्यानंतर त्यांचे पक्षाशी मतभेद झाले आहेत. ते आता केवळ काही राजकीय समीकरणे बसवण्याचा प्रयत्न करत आहेत.