संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी
झारखंड, छत्तीसगड विधानसभेतील तब्बल १६ आमदार शुक्रवारी रात्रीपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. हे सर्व आमदार भाजपचे असून त्यांच्यासोबत पक्षाचे काही उच्चपदाधिकारी देखील आहेत. त्यांच्या मुक्कामी दोन्ही हॉटेल बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त असून ही बैठक आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या रणनीतीचा एक भाग असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विभागवार तयारीच्या अनुषंगाने भाजपने मराठवाड्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून झारखंड, छत्तीसगड येथील भाजपचे तब्बल १६ आमदार छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी सकाळपर्यंत दाखल झाले. स्थानिक भाजप पदाधिकारी समीर राजूरकर आणि अहमदनगर येथील प्रकाश गांधी येथील समन्वयक आहेत. आज सकाळी ११ वाजेपासून राज्यातील भाजप पदाधिकारी आणि झारखंड, छत्तीसगडचे आमदार, पदाधिकारी यांची एक महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. ही बैठक आगामी विधानसभेच्या तयारीचा भाग असल्याची माहिती आहे.
मराठवाड्यातील २५ जागांवर लक्ष
भाजपने मराठवाड्यातील विधानसभेच्या २५ जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. या जागांवर विजय कसा मिळवायचा यावरच या बैठकीत खल होणार आहे. बैठकीत उपस्थित झारखंड, छत्तीसगडमधील आमदार आणि भाजप पदाधिकारी यांना या मतदारसंघांची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच उद्या (रविवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहरात असून त्यांच्यासोबत देखील या सर्वांची बैठक होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
…………………………………