27.1 C
Latur
Tuesday, May 28, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरेंना ‘फाईल’ दाखवून भाजपने प्रचाराला लावले

ठाकरेंना ‘फाईल’ दाखवून भाजपने प्रचाराला लावले

विजय वडेट्टीवार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधीच महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने ते राज्यभरात जाहीर सभा घेत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. अशातच काल, शुक्रवारी पुणे शहरात महायुतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेण्यात आली होती.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, मशिदींमधून मौलवी फतवे काढत असतील तर, मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी काल केले. यावरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर टीकेची झोड उठवत निशाणा साधला आहे. राज ठाकरेंना फाईल दाखवून भाजपने प्रचाराला लावले असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या लाईनमध्ये फिट होते. मात्र त्यांना दिल्लीत बोलावून काही फाईल दाखवल्या गेल्या आणि सांगितले गेले की, प्रचार आमचाच करावा लागेल. म्हणून त्यांना आज अशा पद्धतीने महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागत असल्याचे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते नागपूर येथे बोलत होते.

२०१९ च्या निवडणुकांमध्ये प्रचार करताना राज ठाकरे मोदी-शहांवर टीका करताना त्यांना हुकूमशहा म्हणून संबोधत होते. मात्र, आता त्या हुकूमशाहीचा या देशातील लोकशाही टिकवणा-यांना अचानक एवढा काय पुळका आलाय, असा प्रश्नही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. मात्र, राज ठाकरेंच्या या आवाहनाला लोक कितपत प्रतिसाद देतील, हे येणारा काळ ठरवेल. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. यापूर्वी अजित पवारांविरोधात बोलताना राज ठाकरे अगदी अश्लाघ्य भाषेमध्ये टीका करत होते. धरणाच्या वक्तव्यावर सूतोवाच करणारे कोण ते हेच राज ठाकरे आहेत का? आता राज ठाकरेंच्या तोंडात चमचाभर नाही तर मूठभर साखर घालायला पाहिजे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR