27.9 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeमहाराष्ट्र ठाकरे गटाकडून नवरात्रोत्सवानिमित्त देवीचे गाणे लाँच

 ठाकरे गटाकडून नवरात्रोत्सवानिमित्त देवीचे गाणे लाँच

 मुंबई : प्रतिनिधी
  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तयार केलेल्या प्रचार गीतावर वाद निर्माण झाला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘जय भवानी’ या शब्दावर आक्षेप घेत तो वगळण्याची सूचना केली होती. मात्र ठाकरे गटाने तो शब्द वगळणार नसल्याची ठाम भूमिका घेतली होती. यानंतर आता घटस्थापनेच्या मुहूर्तावर ठाकरे गटाकडून देवीचे गाणे लाँच करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले.  निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेनेचा दर्जा देत त्यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिले तर ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आले. ‘मशाल’ चिन्ह लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी ठाकरे गटाने प्रचार गीत लाँच केले होते. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाच्या २०२३ च्या परिपत्रकानुसार ठाकरे गटाच्या मशाल या गीतामधील ‘जय भवानी’ या शब्दावर आक्षेप घेत तो वगळण्याची सूचना केली होती.
 सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी ही सूचना नाकारत ‘जय भवानी’ आणि ‘हिंदू हा तुझा धर्म’ हे शब्द वगळण्यास नकार दिला होता.  मात्र या वादानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मशाल गीत’ हे थीम साँग लाँच केले आहे.
  उद्धव ठाकरे म्हणाले की, हे गाणे आमच्या राजकीय लढाईचा भाग नाही, मात्र राज्यातील अस्थिरतेला उत्तर देणारे आहे. महिलांच्या हाती मशाल देत आम्ही पुढे जाणार आहोत. कारण गेली दोन वर्षे आम्ही न्यायमंदिराचे दार ठोठावत आहोत, मात्र अजूनही आम्हाला न्याय मिळालेला नाही.
तसेच राज्यात वारेमाप भ्रष्टाचार होत आहे आणि कोणी त्राता नाही. त्यामुळे आम्ही जगदंबेच्या आशीर्वादाची प्रार्थना करत आहोत, असे म्हणत त्यांनी ‘आई दार उघड’ असे म्हणत त्यांनी आवाहनही केले. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंनी लाँच केलेल्या गाण्यावर भाजपा आणि शिंदे गट हे टीका करताना दिसतील. मात्र निवडणूक आयोग या गाण्यामधील शब्दावरही आक्षेप घेणार का? हेही पाहावे लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR